संविधान दिन २०२५: PM नरेंद्र मोदींचे देशाला खुले पत्र; म्हणाले, “निवडणुकीत मतदानाची संधी...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 14:18 IST2025-11-26T14:16:50+5:302025-11-26T14:18:07+5:30

Constitution Day 2025 PM Narendra Modi Letter To Nation: संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना उद्देशून खुले पत्र लिहिले आहे.

indian constitution day 2025 pm narendra modi wrote a open letter to fellow citizens | संविधान दिन २०२५: PM नरेंद्र मोदींचे देशाला खुले पत्र; म्हणाले, “निवडणुकीत मतदानाची संधी...”

संविधान दिन २०२५: PM नरेंद्र मोदींचे देशाला खुले पत्र; म्हणाले, “निवडणुकीत मतदानाची संधी...”

Constitution Day 2025 PM Narendra Modi Letter To Nation: २६ नोव्हेंबर हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे. १९४९ मध्ये याच दिवशी संविधान सभेने भारतीय संविधान स्वीकारले होते. म्हणूनच एका दशकापूर्वी २०१५ मध्ये एनडीए सरकारने २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला, असे नमूद करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना उद्देशून खुले पत्र लिहिले आहे. 

आपले संविधान हे एक पवित्र दस्तऐवज आहे, जे देशाच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने मार्गदर्शक आहे. भारतीय संविधानाच्या सामर्थ्यानेच माझ्यासारख्या गरीब कुटुंबातील सामान्य व्यक्तीला पंतप्रधानपदापर्यंत पोहोचवले. संविधानामुळेच मला २४ वर्षे सरकार प्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मला आठवते की, २०१४ मध्ये जेव्हा मी पहिल्यांदा संसद भवनात प्रवेश केला, तेव्हा मी पायऱ्यांवर नतमस्तक झालो होतो. लोकशाहीच्या सर्वात मोठ्या मंदिराला नमन केले होते. २०१९ मध्ये, निवडणूक निकालानंतर जेव्हा संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये प्रवेश केला तेव्हा मी सहजतेने संविधानाला नमस्कार केला, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. 

भारताच्या संविधानाच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान

संविधान दिनानिमित्त आपण सर्व महान व्यक्तींचे स्मरण करतो, ज्यात डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा समावेश आहे. भारताच्या संविधानाच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेचे स्मरण करतो, ज्यांनी असाधारण दूरदृष्टीने या प्रक्रियेचे सतत मार्गदर्शन केले. संविधान सभेत अनेक प्रतिष्ठित महिला सदस्यांचाही समावेश होता. त्यांनी आपले प्रखर विचार आणि दृष्टिकोन ठेवून संविधान समृद्ध केले. सन २०१० मध्ये संविधानाने ६० वा वर्धापन दिन साजरा केला, तेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री होतो. आम्ही संविधानाबद्दल कृतज्ञता आणि निष्ठा व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. २०१० मध्ये गुजरातमध्ये संविधान गौरव यात्रा आयोजित करण्यात आली होती. हत्तीवर या पवित्र ग्रंथाची प्रतिकृती घेऊन त्या भव्य मिरवणुकीचे नेतृत्व केले होते, अशी आठवण पंतप्रधान मोदी यांनी या पत्रातून सांगितली.

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्यास प्रेरित केले

संविधानाने त्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा केला, तेव्हा आमच्या सरकारसाठी हा एक ऐतिहासिक प्रसंग होता. देशभरात एक विशेष मोहीम सुरू करण्याचे भाग्य आम्हाला लाभले. संविधानाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त आमच्या सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आणि देशव्यापी जागरूकता मोहीम सुरू केली. ही मोहीम लोक सहभागाचा एक प्रमुख उत्सव बनली. या वर्षी सरदार पटेल आणि भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती आहे. सरदार पटेल यांच्या नेतृत्वाने देशाचे राजकीय एकीकरण सुनिश्चित केले. सरदार पटेल यांच्या प्रेरणेमुळेच सरकारला जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्यास प्रेरित केले. कलम ३७० रद्द केल्यानंतर भारतीय संविधान तेथे पूर्णपणे लागू झाले आहे आणि लोकांना संविधानाने हमी दिलेले सर्व अधिकार मिळाले आहेत. भगवान बिरसा मुंडा यांचे जीवन आजही आपल्याला आदिवासी समुदायाला न्याय, प्रतिष्ठा आणि सक्षमीकरण सुनिश्चित करण्यासाठी प्रेरणा देते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

आपण आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडतो तेव्हा...

या वर्षी वंदे मातरम् याची १५० वी जयंती साजरी करत आहोत. वंदे मातरम् हे प्रत्येक युगात प्रासंगिक राहिले आहे. त्याचे शब्द भारतीयांच्या सामूहिक संकल्पाचे सातत्याने प्रतिध्वनीत आहेत. या वर्षी आपण श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या हौतात्म्याची ३५० वी जयंती साजरी करत आहोत. जीवन आणि हौतात्म्याची गाथा आजही आपल्याला प्रेरणा देते. या सर्वांचे जीवन आपल्याला आपल्या संविधानाने सर्वात महत्वाचे घोषित केलेल्या कर्तव्याला प्राधान्य देण्याची प्रेरणा देते. आपल्या संविधानाचा कलम ५१अ मूलभूत कर्तव्यांना समर्पित आहे. ही कर्तव्ये आपल्याला सामाजिक आणि आर्थिक प्रगती साध्य करण्याचा मार्ग दाखवतात. महात्मा गांधींनी नेहमीच नागरिकांच्या कर्तव्यांवर भर दिला. त्यांचा असा विश्वास होता की, जेव्हा आपण आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडतो तेव्हा आपले अधिकार आपोआपच मिळतात.

२०४७ पर्यंत आपण स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण करू

आता येणारा काळ आणखी महत्त्वाचा आहे. २०४७ पर्यंत आपण स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण करू. २०४९ मध्ये आपण संविधानाची १०० वर्षे पूर्ण करू. आपण तयार केलेली धोरणे आणि आज आपण घेतलेले निर्णय येणाऱ्या वर्षांवर, येणाऱ्या पिढ्यांवर परिणाम करतील. विकसित भारताचे ध्येय आहे, म्हणून राष्ट्राप्रती असलेली कर्तव्ये सर्वोच्च ठेवून पुढे गेले पाहिजे. राष्ट्र आणि समाजाप्रती असलेली आपली कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. देशाने आपल्याला खूप काही दिले आहे. आपण सर्वांनी यासाठी कृतज्ञतेचे भान ठेवले पाहिजे. आपण या भावनेने जीवन जगतो तेव्हा कर्तव्य आपोआप आपल्या जीवनाचा एक भाग बनते. कर्तव्य पार पाडण्यासाठी, प्रत्येक कार्य पूर्ण क्षमतेने आणि पूर्ण निष्ठेने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक कृतीने संविधान मजबूत केले पाहिजे. प्रत्येक कृतीने राष्ट्रीय हिताशी संबंधित उद्दिष्टे पूर्ण केली पाहिजेत. सर्वांची जबाबदारी आहे की, संविधान निर्मात्यांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करावीत. कर्तव्याच्या भावनेने काम करतो तेव्हा देशाची सामाजिक आणि आर्थिक प्रगती अनेक पटींनी वाढेल, अशी अपेक्षा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.

दरम्यान, संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. नागरिक म्हणून मतदानाची कोणतीही संधी सोडू नये, हे आपले कर्तव्य आहे. २६ नोव्हेंबर रोजी आपण वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांसाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विशेष समारंभ आयोजित केले पाहिजे. आपण त्यांना असे वाटायला हवे की, ते आता फक्त विद्यार्थी नाहीत तर धोरणनिर्मिती प्रक्रियेत सक्रिय सहभागी आहेत. शाळांनी दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांचा सन्मान करण्याची परंपरा विकसित केली पाहिजे. अशा प्रकारे तरुणांमध्ये जबाबदारी आणि अभिमानाची भावना निर्माण करतो, तेव्हा ते आयुष्यभर लोकशाहीच्या मूल्यांना समर्पित राहतील. हे समर्पण एका मजबूत राष्ट्राचा पाया रचते. या संविधान दिनी महान राष्ट्राचे कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून जबाबदाऱ्या पार पाडण्याचा संकल्प पुन्हा एकदा दृढ करूया. असे केल्यानेच विकसित आणि मजबूत राष्ट्र उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकू, असे पंतप्रधान मोदी यांनी या पत्रात म्हटले आहे.

Web Title : संविधान दिवस २०२५: पीएम मोदी का खुला पत्र, मतदान कर्तव्य पर जोर

Web Summary : पीएम मोदी के संविधान दिवस पत्र में संविधान का महत्व, उनकी यात्रा और नागरिकों के कर्तव्यों पर प्रकाश डाला गया। उन्होंने लोकतंत्र को मजबूत करने के लिए मतदान में भाग लेने और पहली बार मतदान करने वालों का सम्मान करने का आग्रह किया।

Web Title : Constitution Day 2025: PM Modi's open letter emphasizes voting duty.

Web Summary : PM Modi's Constitution Day letter highlights the document's importance, his journey, and citizens' duties. He urged voting participation and honoring first-time voters to strengthen democracy.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.