रमजान संपताच ऑपरेशन ऑलआऊट सुरू; बांदिपुरात 4 दहशतवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 12:12 IST2018-06-18T11:52:12+5:302018-06-18T12:12:38+5:30
शस्त्रसंधी संपल्यानंतरची जवानांची पहिली धडक कारवाई

रमजान संपताच ऑपरेशन ऑलआऊट सुरू; बांदिपुरात 4 दहशतवाद्यांचा खात्मा
श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील शस्त्रसंधी संपुष्टात येताच भारतीय जवानांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. शस्त्रसंधीमुळे हात बांधले गेलेल्या जवानांनी रमजान संपताच केलेल्या धडक कारवाईत चार दहशतवादी ठार झाले. शस्त्रसंधी संपल्यानंतर जवानांनी केलेली ही पहिली कारवाई आहे. याशिवाय आज सकाळी जवानांनी बिजबेहारामध्ये दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे.
सोमवारी सकाळी जवानांनी बांदिपुरात चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. बांदिपुरात 14 जूनलादेखील जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं होतं. या कारवाईत एका जवानाला वीरमरण आलं. आज सकाळी सुरक्षा दलाच्या जवानांना बिजबेहारा भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. यानंतर या भागाला जवानांनी वेढा घातला. या भागात सध्या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.
16 मे रोजी मोदी सरकारनं शस्त्रसंधी जाहीर करत दहशतवाद्यांविरोधातील कारवाई थांबवली. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. मात्र या काळात दहशतवाद्यांच्या कारवायांमध्ये मोठी वाढ झाली. लष्कराचे जवान औरंगजेब यांचं अपहरण करुन दहशतवाद्यांनी त्यांची निर्घृण हत्या केली. याशिवाय रायझिंग काश्मीरचे संपादक शुजात बुखारी यांचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आता रमजान संपल्यानं लष्करानं पुन्हा दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे.