India should take advantage of a positive environment to reduce tensions - China | भारताने तणाव कमी करण्यासाठी सकारात्मक वातावरणाचा लाभ घ्यावा, चीनच्या उलट्या बोंबा

भारताने तणाव कमी करण्यासाठी सकारात्मक वातावरणाचा लाभ घ्यावा, चीनच्या उलट्या बोंबा

बिजींग : पूर्व लडाखच्या उर्वरित भागांतून सैनिकांच्या वापसीबाबत भारत-चीन दरम्यानच्या चर्चेत यश मिळाल्यानंतर चीनने म्हटले 
आहे की, भारताने सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी विद्यमान सकारात्मक वातावरणाचा लाभ घेतला पाहिजे.
दोन्ही देशांत ११व्या फेरीची चर्चा १३ तास चालल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय लष्कराने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही देशांनी पूर्व लडाखमध्ये हॉट स्प्रिंग, गोगरा व देपसांगमध्ये तणाव असणाऱ्या उर्वरित भागांतून सैनिकांच्या वापसीबाबत तपशीलवार चर्चा केली. शांतता राखणे, नवीन तणाव न वाढविणे व उर्वरित मुद्द्यांवर जलद गतीने तोडगा काढण्यावर सहमती झाली आहे.
दरम्यान, याप्रक्रियेत असणाऱ्या व्यक्तींनी दिल्लीत सांगितले होते की, दोन्ही देशांत लष्करी चर्चा झाली असली तरी त्यात ठोस प्रगती झालेली नाही. कारण चीनचे शिष्टमंडळ पूर्वविचार करूनच चर्चेत सहभागी झाले होते. त्या देशाने संघर्षरत उर्वरित भागांमध्ये सैनिक मागे घेण्याच्या प्रक्रियेवर पुढचे पाऊल उचलण्याच्या दिशेने कोणतीही लवचिकता दाखविली नाही.
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) ९ एप्रिलच्या चर्चेबाबत एक निवेदन जारी केले आहे. फेब्रुवारीमध्ये पेंगाँग सरोवराच्या बहुतांश वादग्रस्त भागांत सैनिकांच्या वापसीकडे इशारा करीत म्हटले आहे की, भारताने सीमेवरील तणाव कमी करण्याच्या दिशेने पुढे आले पाहिजे.
वास्तविक नियंत्रण रेषेवर भारताच्या बाजूच्या चुशूल सीमा केंद्रावर झालेल्या चर्चेबाबत पीएलएने जारी केलेल्या निवेदनाचा हवाला देऊन चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्कने (सीजीटीएन) म्हटले आहे की, मागील चर्चेतील सहमतीवर दोन्ही देशांनी आता पुढचे पाऊल टाकण्याची गरज आहे. 

सीमेवर शांतता स्थापित करण्यासाठी पुढे यावे
पीएलएच्या वेस्टर्न थिएटर कमांडच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, मागील चर्चांमध्ये झालेल्या सहमतीचे पालन करून सीमा भागातील तणाव कमी करण्यासाठी विद्यमान सकारात्मक वातावरणाचा भारत लाभ घेईल. त्याचबरोबर सीमेवर शांतता स्थापित करण्याच्या दिशेने पुढे येईल, अशी आशा आहे. कारण चीनही त्याच दिशेने पुढे सरकत आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: India should take advantage of a positive environment to reduce tensions - China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.