India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 09:01 IST2025-05-12T08:59:28+5:302025-05-12T09:01:00+5:30
India Pakistan War: गेल्या काही दिवसापासून भारत -पाकिस्तान सीमेवर तणाव सुरू होता, आज दोन्ही देशातील सीमेवर परिस्थिती सुधारत आहे.

India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
India Pakistan War ( Marathi News ): पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव निर्माण झाला होता. भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' च्या माध्यमातून पाकिस्तानमधील नऊ दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले केले. या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. यानंतर पाकिस्तान लष्कराने हल्ले सुरू केले होते. या हल्ल्यांना भारतीय लष्कराने प्रत्युत्तर दिले. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्ती करत युद्धविरामची घोषणा केली. पण, त्याच दिवशी रात्री पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार करण्यात आला होता. दरम्यान,आज सीमेवर परिस्थिती सामान्य झाली असून गोळीबार झाला नसल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली.
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
सीमेवरील परिस्थितीची माहिती आज भारतीय लष्कराने दिली. सीमेवर सर्व काही सामान्य आहे. पाकिस्तानकडून कोणताही हल्ला झालेला नाही. गोळीबाराची कोणत्याही घटनेची नोंद झाली नाही, त्यामुळे अलिकडच्या काही दिवसांत ही पहिलीच शांत रात्र ठरली.
दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमधील अखनूर येथून सकाळचा एक व्हिडीओ समोर आला आहे. जम्मू-काश्मीर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील इतर भागात रात्रीनंतर आता सकाळी जनजीवन सामान्य आहे, अशी माहिती लष्कराने दिली.
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार
भारताने या कारवाईत मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांसह १००हून अधिक दहशतवादी यमसदनी पाठवले. ७ ते १० मेदरम्यान शत्रूच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे ३५ ते ४० सैनिक मारले गेल्याची माहिती या वेळी देण्यात आली. या संपूर्ण मोहिमेत हवाई दलाचे सर्व पायलट सुखरूप परतल्याचे एअर मार्शल ए. के. भारती यांनी सांगितले. तर, वेळप्रसंगी कराची बंदरावर जोरदार हल्ल्यासाठी नौदल सज्ज होते, असे व्हाईस ॲडमिरल ए. एन. प्रमोद यांनी सांगितले. ( India Pakistan War )
लष्करी मोहिमांचे महासंचालक (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितले की, या संघर्षात ३५-४० पाकिस्तानी लष्करी जवान ठार करण्यात आले. या कारवाईत भारताचे उद्दिष्ट साध्य झाले आहे आणि यापुढे पाकिस्तानने कोणतेही दु:साहस केले तर त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल.