सीमेपलीकडे 8 दहशतवादी छावण्या सक्रिय; लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची मोठी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 13:59 IST2026-01-13T13:56:21+5:302026-01-13T13:59:28+5:30
India-Pakistan: ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप सुरू असून, भारतीय सैन्य पूर्णपणे सज्ज असल्याचे लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले.

सीमेपलीकडे 8 दहशतवादी छावण्या सक्रिय; लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची मोठी माहिती
India-Pakistan: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याकडून सीमेवर करडी नजर ठेवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी स्पष्टपणे इशारा दिला की, सीमेपलीकडे सध्या 8 दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे सक्रिय असल्याची महत्वाची माहिती त्यांनी दिली.
नेमकं काय म्हणाले जनरल द्विवेदी?
15 जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या आर्मी डेच्या पार्श्वभूमीवर, आज(13 जानेवारी 2026) रोजी दुपारी 12 वाजता दिल्लीतील मानेकशॉ सेंटर येथे झालेल्या वार्षिक पत्रकार परिषदेत त्यांनी देशाच्या अंतर्गत व सीमावर्ती सुरक्षेवर सविस्तर माहिती दिली. लष्करप्रमुखांनी सांगितले की, सध्या भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडे 8 दहशतवादी प्रशिक्षण तळ कार्यरत आहेत. यापैकी 2 तळ आंतरराष्ट्रीय सीमेजवळ, तर 6 तळ LoC जवळ आहेत.
कोणतीही हालचाल झाली तर...
या तळांमध्ये प्रशिक्षणासारख्या हालचाली सुरू असून, गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार भारतीय लष्कर सतत लक्ष ठेवून आहे. अंदाजे 100 ते 150 दहशतवादी या तळांमध्ये असण्याची शक्यता त्यांनी नमूद केली. जर या दहशतवादी तळांमधून घुसखोरीचा प्रयत्न झाला, तर भारतीय लष्कर कठोर कारवाई करेल, असा इशारा जनरल द्विवेदी यांनी दिला. ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप सुरू असून, लष्कर पूर्णपणे सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Annual Press Conference 2026
— ADG PI - INDIAN ARMY (@adgpi) January 12, 2026
‘WATCH LIVE’
Watch #GeneralUpendraDwivedi, #COAS address the media during the ‘Annual Press Conference 2026’ on 13 January from 12:00 PM onwards on the YouTube Channel of the Indian Army https://t.co/pt3du9u8vB
जम्मू-काश्मीर संवेदनशील पण नियंत्रणात
जम्मू-काश्मीरमधील स्थिती संवेदनशील असली तरी सध्या नियंत्रणात आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या कोणत्याही कारवाईला कठोर उत्तर दिले जाईल. पाकिस्तानच्या अण्वस्त्र धमक्यांना निष्प्रभ करण्यात आले आहे. तसेच, मणिपूर आणि ईशान्य भारतातील स्थिती हळूहळू स्थिर होत असल्याचे लष्करप्रमुखांनी सांगितले. म्यानमारमधील निवडणुका संपल्यानंतर भारत-म्यानमार लष्करी सहकार्य अधिक प्रभावी होणार असल्याचेही द्विवेदी यांनी सांगितले.
लष्कराच्या आधुनिकीकरणावर भर
भारतीय लष्कर सध्या व्यापक आधुनिकीकरणाच्या टप्प्यात आहे. प्रगत ब्रह्मोस क्षेपणास्त्र, उच्च क्षमतेचे ड्रोन्स आणि लॉयटरिंग म्युनिशन (फिरती क्षेपणास्त्रे) ही शस्त्रसज्जता लवकरच लष्करात सामील होणार आहे. याशिवाय, 90 टक्क्यांहून अधिक गोळा-बारूद आता स्वदेशी उत्पादनातून मिळत असल्याची महत्त्वाची माहिती त्यांनी दिली. याशिवाय, महिलांसाठी लष्करात संधी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. CMP नंतर आता AEC (आर्मी एज्युकेशनल कोर), मेडिकल (नॉन-टेक्निकल) या विभागांमध्ये महिलांना सैनिक/अग्निवीर म्हणून भरती करण्यात येणार आहे, असेही लष्करप्रमुखांनी सांगितेल.