बापरे! पाण्याच्या बॉटलला युद्धाचा फटका, भाव वाढणार? भारतीय व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 13:06 IST2026-03-13T13:05:50+5:302026-03-13T13:06:30+5:30

भारताची जवळपास ५ अब्ज डॉलरची पॅकेज्ड वॉटर इंडस्ट्रीही आता या युद्धाच्या विळख्यात सापडली आहे.

india packaged water prices soar polymer cost increase israel iran war impact | बापरे! पाण्याच्या बॉटलला युद्धाचा फटका, भाव वाढणार? भारतीय व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण

बापरे! पाण्याच्या बॉटलला युद्धाचा फटका, भाव वाढणार? भारतीय व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण

उन्हाळा वाढत असतानाच पाण्याची मागणीही वाढू लागली आहे, विशेषतः पॅकेज्ड वॉटर बॉटलची मागणी वेगाने वाढत आहे. मात्र यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे विविध व्यवसायांवर परिणाम होत आहे. भारताची जवळपास ५ अब्ज डॉलरची पॅकेज्ड वॉटर इंडस्ट्रीही आता या युद्धाच्या विळख्यात सापडली आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, युद्धामुळे भारतात पॅकेज्ड वॉटर बॉटलच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

युद्धामुळे केवळ कच्च्या तेलाचे भाव वाढले नाहीत, तर प्लास्टिकच्या बाटल्या, लेबल आणि कार्डबोर्ड बॉक्ससह इतर साहित्याचे दरही वाढले आहेत. 'फेडरेशन ऑफ ऑल इंडिया पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन'च्या मते, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे पॉलिमरची किंमत वाढली आहे. पॉलिमर हे कच्च्या तेलापासून बनवलं जातं आणि प्लास्टिक बाटल्यांच्या निर्मितीसाठी तो मुख्य घटक आहे.

प्लास्टिक बाटलीसाठी लागणाऱ्या साहित्याचा खर्च ५०% नी वाढून १७० रुपये प्रति किलो झाला आहे. बाटलीच्या झाकणाची किंमत दुप्पट होऊन ०.४५ रुपये प्रति नग झाली आहे. याशिवाय कोरुगेटेड बॉक्सेस, लेबल्स आणि चिकटवण्यासाठी लागणाऱ्या टेपच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे.

'टाइम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार, भारताच्या एकूण प्लास्टिक उत्पादनापैकी सुमारे ३५% ते ४०% वाटा गुजरातचा आहे, जिथे १०,००० हून अधिक युनिट्स कार्यरत आहेत. इस्रायल-इराण संघर्षानंतर पॉलिमरच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीचा या क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. गेल्या १२ दिवसांत PET पॉलिमरच्या किमती सुमारे ४०% नी वाढल्या आहेत.

'गुजरात स्टेट प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन' (GSPMA) ने दिलेल्या माहितीनुसार, पॉलिमरच्या किमतीत प्रति किलो १८ ते ३२ रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे लहान उत्पादकांवर दबाव वाढला असून त्यांना जुन्या दरात ऑर्डर पूर्ण करणं अशक्य झालं आहे. सध्या किरकोळ बाजारात किमती स्थिर असल्या तरी लवकरच ग्राहकांच्या खिशाला याची झळ बसू शकते.

Web Title : युद्ध का असर: भारत में पैकेज्ड पानी की कीमतें बढ़ने की आशंका।

Web Summary : ईरान-इजराइल संघर्ष से भारत में पैकेज्ड पानी की कीमतें बढ़ सकती हैं। कच्चे तेल की बढ़ती कीमतों से प्लास्टिक उत्पादन लागत बढ़ी, जिसका असर बोतलों की कीमतों पर पड़ेगा। पॉलिमर की कीमतें 40% तक बढ़ी।

Web Title : War impact: Packaged water prices likely to rise in India.

Web Summary : Iran-Israel conflict may hike packaged water prices in India. Rising crude oil prices increase plastic production costs, impacting bottle prices. Polymer costs up 40%.