उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 13:24 IST2025-08-19T13:22:48+5:302025-08-19T13:24:46+5:30
VP Election: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे बी सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली आहे. विरोधी पक्षांनी एकमताने रेड्डी यांची निवड केल्याचे ते म्हणाले.

उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर केलेली असताना आता इंडिया आघाडीनेही विरोधकांचा उमेदवार जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी हे इंडिया आघाडीचे उमेदवार असणार आहेत.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे बी सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली आहे. विरोधी पक्षांनी एकमताने रेड्डी यांची निवड केल्याचे ते म्हणाले.
बी सुदर्शन रेड्डी हे मुळचे आंध्र प्रदेशातील रंगा रेड्डी जिल्ह्यातील आहेत. त्यांचा जन्म ८ जुलै १९४६ रोजी झाला होता. शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि गोव्याचे पहिले लोकायुक्त राहिले आहेत. १९७१ मध्ये हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले आहे. सुदर्शन रेड्डी यांची १२ जानेवारी २००७ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि ते ८ जुलै २०११ रोजी निवृत्त झाले. निवृत्तीनंतर, त्यांनी मार्च २०१३ मध्ये गोव्याचे पहिले लोकायुक्त म्हणून पदभार स्वीकारला, जरी त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे ऑक्टोबर २०१३ मध्ये राजीनामा दिला होता.
राधाकृष्णन एनडीएचे उमेदवार
चंद्रपुरम पोन्नूस्वामी राधाकृष्णन असे महाराष्ट्राच्या राज्यपालांचे नाव असून ते मुळचे तामिळनाडूचे आहेत. राधाकृष्णन यांनी त्यांच्या राजकीय प्रवासात अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. त्यांनी ३१ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी त्यांनी १८ फेब्रुवारी २०२३ ते ३० जुलै २०२४ पर्यंत झारखंडचे राज्यपाल म्हणून काम पाहिले होते. मार्च ते जुलै २०२४ पर्यंत तेलंगणाचे राज्यपाल आणि मार्च ते ऑगस्ट २०२४ पर्यंत पाँडिचेरीचे उपराज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार सांभाळला आहे.