रिपोर्ट! ९० च्या दशकात वर्षातील ३११ दिवस मिळायची शुद्ध हवा, आता मिळते फक्त २३६ दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 10:01 IST2026-04-28T09:59:55+5:302026-04-28T10:01:07+5:30
आयआयटी दिल्ली अहवालात ‘एक्स्पोजर बायस’बाबत गंभीर इशारा देण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या मते, तुमच्या फोनवर दिसणारा (हवेचा गुणवत्ता निर्देशांक) पूर्ण सत्य सांगत नाही.

रिपोर्ट! ९० च्या दशकात वर्षातील ३११ दिवस मिळायची शुद्ध हवा, आता मिळते फक्त २३६ दिवस
नवी दिल्ली - देशातील हवेत प्रदूषणाचे ‘विष’ अशा रीतीने भिनले आहे की, आता वर्षातील एक तृतीयांश काळ आपल्याला प्रदूषित हवेतच श्वास घ्यावा लागत आहे. आयआयटी दिल्ली आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तज्ज्ञांनी तयार केलेल्या ताज्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे.
अहवालानुसार, १९८७ ते २०२४ या काळात ६४ शहरांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता, ९० च्या दशकात वर्षातील १५% दिवस ‘गंभीर’ श्रेणीतील प्रदूषण सहन करावे लागत होते. मात्र, आता हा आकडा ३५ टक्के झाला आहे.
३८ वर्षांच्या प्रवासाचे ३ टप्पे
१९८७-१९९३ (ताजेतवाने दिवस) : या काळात वर्षातील सरासरी ८५ टक्के दिवस हवा शुद्ध असायची.
१९९४-२००८ (बिघडलेली परिस्थिती) : विकासाच्या वेगासोबत प्रदूषणाने पाय पसरले. खराब हवेच्या दिवसांचे प्रमाण १५ टक्क्यांच्या पुढे गेले. दिल्ली आणि आग्रा या शहरांची हवा बिघडण्यास सुरुवात झाली.
२००९-२०२४ (प्रदूषणाचा विळखा) : गेल्या १५ वर्षांत परिस्थिती भयावह झाली आहे. वर्षातील ३५ टक्के दिवस हवा ‘खराब’ किंवा ‘गंभीर’ श्रेणीत असते. किनारपट्टीवरील शहरेही आता सुरक्षित उरलेली नाहीत.
सरकारी आकडेवारीपेक्षा १० टक्के जास्त धोका!
अहवालात ‘एक्स्पोजर बायस’बाबत गंभीर इशारा देण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या मते, तुमच्या फोनवर दिसणारा (हवेचा गुणवत्ता निर्देशांक) पूर्ण सत्य सांगत नाही. सरकारी आकडेवारीच्या तुलनेत आपण प्रत्यक्षात १० टक्के जास्त प्रदूषित हवेत श्वास घेत आहोत. शास्त्रज्ञांनी सुचवले आहे की, आता शहरांमधील प्रदूषण मोजण्यासाठी ‘एक्स्पोजर वेटेड सिस्टीम’ वापरण्याची गरज आहे, जेणेकरून जनतेला त्यांच्या आरोग्याला असलेल्या धोक्याची अचूक माहिती मिळू शकेल.