भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 07:26 IST2025-10-24T07:24:59+5:302025-10-24T07:26:05+5:30
Hyderabad-Bangalore Bus Accident: हैदराबाद-बंगळूर महामार्गावर भीषण दुर्घटना, बसमध्ये सुमारे डझनभर प्रवासी आपत्कालीन दरवाजातून बाहेर पडण्यात यशस्वी झाले, ज्यामुळे त्यांचे प्राण वाचले.

भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
कर्नूल, आंध्र प्रदेश: हैदराबाद-बंगळूर महामार्गावर कर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकुर गावाजवळ आज पहाटेच्या सुमारास एक मोठी आणि मन हेलावून टाकणारी दुर्घटना घडली. ‘कावेरी ट्रॅव्हल्स’च्या खासगी स्लीपर कोच बसला एका दुचाकीने धडक दिल्यानंतर बसने भीषण पेट घेतला. या दुर्घटनेत २० प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला असून, अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीनंतर हा अपघात झाला, त्यावेळी बसमधील अनेक प्रवासी गाढ झोपेत होते. दुचाकीच्या धडकेमुळे बसच्या इंधन टाकीजवळ आग लागली आणि ती काही क्षणातच संपूर्ण बसमध्ये पसरली. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की प्रवाशांना बाहेर पडायला फारसा वेळ मिळाला नाही.
बसमध्ये सुमारे डझनभर प्रवासी आपत्कालीन दरवाजातून बाहेर पडण्यात यशस्वी झाले, ज्यामुळे त्यांचे प्राण वाचले. जखमी झालेल्या सर्व प्रवाशांना तातडीने कर्नूल येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली, मात्र तोपर्यंत २० जणांनी जीव गमावला होता. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
मुख्यमंत्री नायडूंकडून दुःख व्यक्त
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. "चिन्ना टेकुरजवळ झालेल्या बस अपघाताची बातमी ऐकून मोठा धक्का बसला. ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींवर योग्य उपचार व्हावेत आणि पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत मिळावी, यासाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत," असे त्यांनी समाजमाध्यमावर (X) पोस्ट करून सांगितले.