UP Crime:उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील एका वृद्ध सावकाराच्या हत्येचा उलघडा करण्यास पोलिसांना यश आलं आहे. अमरोहा येथे दोन दिवसांपूर्वी एका घरात बेडवर मृतदेह आढळल्याप्रकरणी पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली आहे. ज्या व्यक्तीचा मृतदेह बेडवर आढळला तो सावकार असल्याची माहिती पुढे आली आहे. व्याजाच्या रक्कम देण्याच्या बदल्यात पत्नीला एक महिना सोबत ठेवण्याची मागणी सावकाराने केली होती. या मागणीवरुन संतापलेल्या पतीने सावकाराची हत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी पती पत्नीला अटक करुन कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
अमरोहाच्या हसनपूर पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी ७० वर्षीय हनीफ उर्फ इलायची याचा मृतदेह दोन दिवसांपूर्वी त्यांच्याच घरात बेडवर आढळला होता. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.पोलिसांनी घराबाहेरील सीसीटीव्ही तपासले असता एक जोडपं बाईकवरुन जात असल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांनी तपास करुन या पती पत्नीला अटक केल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला.
अटक करण्यात आलेला आरोपी शमशेर खानने चौकशीदरम्यान पोलिसांकडे सगळ्या प्रकरणाचा खुलासा केला. चार महिन्यांपूर्वी शमशेरने मृत हनीफ उर्फ इलायचीकडून त्याची मोटारसायकल आणि बॅटरी गहाण ठेवून व्याजावर २५,००० रुपये घेतले होते. शमशेरने सांगितले की तो आर्थिक संकटाचा सामना करत होता, त्यामुळे त्याला हनीफकडून घेतलेल्या २५,००० रुपये परत करता येत नव्हते. त्यामुळे त्याच्यावरील व्याजही वाढत होते. वाढलेल्या व्याजामुळे शमशेरला चिंता वाटू लागली. त्यामुळे कर्ज माफ करावं यासाठी शमशेर पत्नीसह २७ एप्रिल रोजी मृत हनीफच्या घरी गेला होता. तिथे शमशेरने त्याच्या पत्नीला हनीफच्या घराच्या ड्रॉईंग रूममध्ये बसवले आणि तो स्वतः हनीफशी बोलण्यासाठी त्याच्या खोलीत गेला.
शमशेर हनीफकडे मोटारसायकल आणि बॅटरी परत करण्यासह व्याज माफ करण्याची विनंती करत होता. मात्र हनीफ ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यावेळी हनीफने तू तुझ्या बायकोला एक महिना माझ्याकडे सोड. मी तुमचे सर्व व्याज माफ करेन आणि गहाण ठेवलेली मोटारसायकल आणि बॅटरी देखील तुला परत करेन, असं म्हटल्याचे शमशेरने सांगितले. याचाच राग येऊन शमशेरने कपड्याने हनीफचा गळा दाबून त्याची हत्या केली.
त्यानंतर शमशेर बाहेर आला आणि त्याने पत्नीला हा सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर दोघांनीही हनिफचा मृतदेह बेडवर नेऊन ठेवला. त्यानंतर दोघांनीही बाईक घेऊन तिथून पळ काढला. हनीफच्या मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर त्याची हत्या झाल्याचे समोर आले. त्यामुळे शेजारच्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे शमशेरचा माग काढला आणि दोघांनाही अटक केली.