रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 11:50 IST2025-08-11T11:49:21+5:302025-08-11T11:50:14+5:30
या भीषण अपघातात चालकासह पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले.

रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
UP Accident:उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका भरधाव रुग्णवाहिकेची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरशी जोरदार धडक झाली. या अपघातात रुग्णवाहिकेत प्रवास करणाऱ्या दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर इतर चार जण जखमी झाले. ज्या कंटेनरला रुग्णवाहिकेची टक्कर झाली त्या कंटेनरचा चालक आणि क्लीनर देखील जखमी झाले.
रुग्णवाहिकेचे तुकडे
ही घटना राष्ट्रीय महामार्ग-१९ वर गोपीगंज कोतवाली परिसरात घडली. हा अपघात इतका भीषण होता की, रुग्णवाहिकेचे तुकडे झाले. वरुण नावाच्या व्यक्तीचा दिल्लीतील रुग्णालयात मृत्यू झाला. वरुणची पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्य त्याचा मृतदेह घेऊन दिल्लीहून बिहारमधील गया येथील त्यांच्या घरी जात होते. गोपीगंजजवळील गोप्पूर येथे रुग्णवाहिकेची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरशी टक्कर झाली.
वरुणची पत्नी ममता आणि एका नातेवाईकाचा मृत्यू
या अपघातात वरुणची पत्नी ममता आणि एका नातेवाईकाचा जागीच मृत्यू झाला. रुग्णवाहिकेच्या चालकासह चार जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर गोपीगंजच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. रुग्णवाहिकेने ज्या कंटेनरला धडक दिली, त्या कंटेनरचा चालक आणि क्लीनरदेखील जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच गोपीगंज पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. जखमींना तात्काळ गोपीगंजच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दोन्ही मृतांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत आणि शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.