Video: सुरतमध्ये भीषण दुर्घटना; आग लागल्याने एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 16:36 IST2026-03-31T16:35:36+5:302026-03-31T16:36:09+5:30
LPG सिलेंडरमधून गॅस गळती झाल्याने आग लागल्याचा संशय.

Video: सुरतमध्ये भीषण दुर्घटना; आग लागल्याने एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
Gujarat News:गुजरातच्या सूरत जिल्ह्यातील लिंबायत परिसरात मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. एका निवासी घराला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि मोठ्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. आग विझवल्यानंतर घरामध्ये पाच जणांचे मृतदेह आढळून आले. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
सिलेंडर गॅस गळतीमुळे आग लागल्याची शक्यता
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घराच्या ग्राउंड फ्लोअरवर स्वयंपाक करत असताना सिलेंडरमधून गॅस गळती झाली आणि अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले. आग इतक्या वेगाने पसरली की, घरातील लोकांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही आणि पाच जण जिवंत जळून मृत्युमुखी पडले.
VIDEO | Surat, Gujarat: A fire broke out in a house near Mithi Khadi in the Limbayat area, killing five people, including four women and a child. Fire brigade and ambulance teams rushed to the spot and carried out rescue operations. Further investigation is underway. pic.twitter.com/vb65IahX57
— Press Trust of India (@PTI_News) March 31, 2026
मृतांमध्ये चार महिला आणि एका लहान मुलाचा समावेश
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये शहनाज बेगम अन्सारी (वय ६५), हुसेना बेगम अन्सारी (वय १८), शबीना रमजान अन्सारी (वय २८), खुशनुमा अब्दुल अन्सारी (वय १९) आणि सुभान रमजान अन्सारी (वय ४) यांचा समावेश आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक (FSL) टीम देखील पोहोचली असून आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. गॅस गळतीमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
घरात साड्यांचा मोठा साठा; त्यामुळे आग वेगाने पसरली
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, घरात सुमारे ८ टन साड्यांचा साठा ठेवण्यात आला होता. हे कुटुंब घरातूनच साड्यांची पॅकिंग आणि स्टिचिंगचे काम करत होते. सूरतमध्ये प्रामुख्याने पॉलिस्टर साड्या तयार केल्या जातात. या साड्यांमध्ये केमिकल आणि ऑईलचा वापर होत असल्याने आग खूप वेगाने पसरली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. घटनेच्या वेळी घरात पुरुष नव्हते.