हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 00:00 IST2025-10-06T23:55:31+5:302025-10-07T00:00:09+5:30
Honeytrap News: गेल्या काही काळापासून हनिट्रॅपच्या घटनांमध्ये लक्षणीयरीत्या वाढ झाली आहे. दरम्यान, गुजरातमधील जुनागड येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका निवृत्त अधिकाऱ्याला महिलेने ऑनलाइन हनिट्रॅपमध्ये अडकवून ब्लॅकमेल केल्याचे उघडकीस आले आहे.

हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
गेल्या काही काळापासून हनिट्रॅपच्या घटनांमध्ये लक्षणीयरीत्या वाढ झाली आहे. दरम्यान, गुजरातमधील जुनागड येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका निवृत्त अधिकाऱ्याला महिलेने ऑनलाइन हनिट्रॅपमध्ये अडकवून ब्लॅकमेल केल्याचे उघडकीस आले आहे. या महिलेने आधी सदर अधिकाऱ्यासोबत सोशल मीडियावर जवळीक साधून मैत्री केली. त्यानंतर प्रत्यक्ष भेटीगाठी झाल्यावर शरीरसंबंध प्रस्थापित केले आणि त्यांचं चित्रिकरण केलं. त्यानंतर हे चित्रिकरण व्हायरल करण्याची धमकी देत ४० लाखांची खंडणी मागितली. मात्र हे प्रकरण पोलिसांकडे पोहोचताच संपूर्ण टोळीचा पर्दाफाश झाला.
या प्रकरणी पोलिसांनी उर्मिला कुमारी, शगुफ्ता आणि जिशान बदवी यांना अटक केली आहे. ही टोळी निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून खंडणी वसूल करत असे. सध्या ही टोळी एका निवृत्त वन अधिकाऱ्याला अडकवून ४० लाखांची खंडणी मागत होती. त्यासाठी त्यांनी हॉटेलमध्ये चित्रित केलेल्या काही खाजगी चित्रफिती सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिसी होती. मात्र पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांचं बिंग फुटलं.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार निवृत्त फॉरेस्ट अधिकाऱ्याला उर्मिला नावाच्या एका महिलेने फेसबूकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. ही रिक्वेस्ट त्यांनी स्वीकारली. त्यानंतर चॅटिंगपासून सुरुवात होत ते जवळ आले. त्यातून शरीरसंबंध प्रस्थापित झाले. या दरम्यान, उर्मिला नावाच्या महिलेने आपल्या वैयक्तिक जीवनाबाबतच्या कहाण्या सांगून तक्रारदारासोबत भावनिक नातंही प्रस्थापित केलं. त्यानंतर एकदा राजकोटमधील हॉटेलमध्ये त्यांच्यात शरीरसंबंध प्रस्थापित झाले. मात्र या शरीरसंबंधांचं चित्रिकरण झाल्याची कल्पना या निवृत्त अधिकाऱ्याला नव्हती.
त्यानंतर उर्मिला हिने आपण गर्भवती असल्याचं सांगत गर्भपात करण्यासाठी पैशांची मागणी केली. सुरुवातीला तक्रारदाराने तिला काही वेळा पैसे दिले. त्यानंतर ती वारंवार पैसे मागू लागली. पुढे काही महिन्यांनी त्यांच्यात पुन्हा एकदा एका हॉटेलमध्ये शरीरसंबंध प्रस्थापित झाले. यावेळीही या संबंधांचं गुपचूप चित्रिकरण करण्यात आलं. त्यानंतर सदर निवृत्त अधिकाऱ्यांना एका अज्ञान व्हॉट्सअॅप क्रमांकावरून फोन आला. तसेच आपल्याकडे तुमचे हॉटेलमधील शरीर संबंध प्रस्थापित करतानाचे अश्लील व्हिडीओ आहेत. तसेच हे व्हिडीओ व्हायरल करायचे नसतील तर मला ४० लाख रुपये द्या, असे या फोन करणाऱ्याने सांगितले.
समोरून ब्लॅकमेल करत असलेल्या व्यक्तीने सदर अधिकाऱ्याला एक व्हिडीओसुद्धा पाठवला. तसेच आपल्याकडे तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा फोटो असून, प्रत्येकाला हा व्हिडीओ पाठवला जाईल, असे सांगितले. दरम्यान, या अधिकाऱ्याने उर्मिला हिला विचारले असता तिनेही आपल्याला ब्लॅकमेल केलं जात असल्याचं सांगितलं. तसेच ती गर्भवती असल्याचं आणि सेटलमेंटच्या नावाखाली पैसे मागू लागली. तेव्हा या माजी अधिकाऱ्याला संशय आला. त्यानंतर त्याने याबाबत पोलिसांत तक्रार दिली.
दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये हे व्हिडीओ स्वत: उर्मिला हिनेच चित्रित केल्याचे समोर आले. तसेच तिने हे व्हिडीओ झिशान या सहकाऱ्याला दिल्याचे उघडकीस आले. त्यानेच या माजी अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी पोलिसांनी उर्मिला शगुफ्ता आणि झिशान यांना अटक केली आहे. तसेच या टोळीने आणखी कुणाला हनिट्रॅपमध्ये अडकवले आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत.