निशिकांत दुबे यांना मराठी खासदारांनी घेरलं; संसद भवनात 'जय महाराष्ट्र'ची घोषणा, लॉबीत काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 14:09 IST2025-07-24T11:46:47+5:302025-07-24T14:09:46+5:30

महिला खासदारांनी मराठी म्हणून स्वाभिमानाने दुबेला जाब विचारला त्याचे आम्ही स्वागत करतो असं सांगत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचे कौतुक केले.  

Hindi vs Marathi Controversy: Nishikant Dubey surrounded by Marathi MP Varsha Gaikwad; 'Jai Maharashtra' slogans in Parliament, what happened in the Sansad lobby? | निशिकांत दुबे यांना मराठी खासदारांनी घेरलं; संसद भवनात 'जय महाराष्ट्र'ची घोषणा, लॉबीत काय घडलं?

निशिकांत दुबे यांना मराठी खासदारांनी घेरलं; संसद भवनात 'जय महाराष्ट्र'ची घोषणा, लॉबीत काय घडलं?

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या हिंदी-मराठी वादाचे पडसाद दिल्लीच्या संसद भवनात उमटले आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसांबाबत वादग्रस्त विधान करणारे भाजपा खासदार निशिकांत दुबे यांना मराठी खासदारांनी संसदेच्या लॉबीत घेरले. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह इतर काही खासदारांनी दुबे यांना घेराव घालत जाब विचारला. त्यावेळी निशिकांत दुबे यांना जय महाराष्ट्र बोलत तिथून काढता पाय घ्यावा लागला. 

याबाबत काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, संसद भवनाच्या लॉबीत निशिकांत दुबे यांना आम्ही रोखले, तिथे तुम्ही महाराष्ट्राबाबत आक्षेपार्ह विधान का केले याचा जाब विचारला. तुम्ही कोणाला आपटून आपटून मारणार आहात हे विचारले. काँग्रेस महिला खासदारांचा आक्रमक पवित्रा पाहून निशिकांत दुबे यांनी तिथून नाही, नाही जय महाराष्ट्र असं म्हणत काढता पाय घेतला असं त्यांनी सांगितले. सध्या घडलेल्या या प्रकाराची संसदेत बरीच चर्चा सुरू आहे. इंडिया टीव्हीवर वर्षा गायकवाड यांनी फोनवरून ही माहिती दिली. 

नेमकं काय घडले?

दुपारी १२.३० ते १ च्या सुमारास महाराष्ट्रातील मराठी खासदार संसदेच्या लॉबीत निशिकांत दुबे यांना शोधत होते. त्यावेळी मनोज तिवारी दिसले, त्यांना वर्षा गायकवाड यांनी निशिकांत दुबे कुठे आहेत अशी विचारणा केली. त्याचवेळी दुबे स्वत: महाराष्ट्रातील खासदारांच्या दिशेने येताना दिसले. त्यानंतर खासदार वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, शोभा बच्छाव यांच्यासह अन्य खासदारांनी निशिकांत दुबे यांना महाराष्ट्राविरोधात केलेल्या विधानावरून जाब विचारला. महिला खासदार दुबे यांना संतप्त प्रश्न विचारत होत्या. तुम्ही कोणाला आपटून आपटून मारणार असं त्यांनी विचारले. त्यावर निशिकांत दुबे हैराण झाले, ते नाही, नाही असं काही नाही म्हणत जय महाराष्ट्र बोलून तिथून काढता पाय घेतला. 'जय महाराष्ट्र'ची घोषणा ऐकून इतर खासदारही तिथे जमले. ही सर्व घटना संसद लॉबीतील कॅन्टीनजवळ घडली. 

दरम्यान, महाराष्ट्राची बदनामी होतेय, त्यामुळे आमच्या महिला खासदारांनी निशिकांत दुबे यांना जाब विचारला. तुम्ही काय केले. दुबेला अडवले. तुमच्यात हिंमत आहे का असा सवाल करत खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. तर पक्षभेद विसरून मराठी म्हणून आपण एकत्र येतोय, महिला खासदारांनी मराठी म्हणून स्वाभिमानाने दुबेला जाब विचारला त्याचे आम्ही स्वागत करतो असं सांगत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचे कौतुक केले.  

Web Title: Hindi vs Marathi Controversy: Nishikant Dubey surrounded by Marathi MP Varsha Gaikwad; 'Jai Maharashtra' slogans in Parliament, what happened in the Sansad lobby?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.