Gurugram Traffic Jam: दिल्ली-एनसीआरमध्ये पावसामुळे वातावरण थंड झाले असले तरी यामुळे अनेकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. 'सायबर सिटी' म्हणून ओळख असलेल्या गुरुग्राममध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. गुरुग्रामच्या रस्त्यांवर इतकी गर्दी होती की लोक तासनतास वाहतुकीत त्यांच्या वाहनांमध्ये अडकून पडले होते. सर्वच मार्गांवर वाहतूक कोंडी झाल्याने गाड्या जागच्या हालत नव्हत्या. या कोंडींचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
सोमवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर गुरुग्राम ठप्प झाले आणि संपूर्ण शहरात सर्वात मोठी वाहतूक कोंडी झाली. रस्त्यांवर वाहनांच्या लांब रांगा लागल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिल्ली आणि रॅपिड मेट्रो स्टेशनचीही अशीच परिस्थिती होती. सोमवारी झालेल्या वाहतूक कोंडीमुळे गुरुग्राममध्ये वाहने २० किलोमीटरपर्यंत रेंगाळत होती.
सोमवारी रात्री राष्ट्रीय महामार्ग ४८ वर चार किलोमीटर लांब वाहतूक कोंडी दिसत होती. हिरो होंडा चौक ते नरसिंहपूर पर्यंत, जिकडे पाहिलं तिकडे फक्त वाहने उभी दिसत होती. दिल्ली ते गुरुग्राम या मार्गावर लोकांनाही खूप अडचणींना तोंड द्यावे लागले. ज्या प्रवासासाठी अर्ध्या तास लागतो त्यासाठी लोकांना तीन ते चार तास वाहतूक कोंडीमध्ये अडकून राहावे लागले.
या प्रचंड वाहतूक कोंडीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ते लोक खूप संतापले आहेत आणि प्रशासनावर गंभीर आरोप करत आहेत. पुन्हा एकदा प्रशासनाचा पर्दाफाश झाला आहे, दरवर्षी दावे केले जातात, पण दरवर्षी पावसाळ्यानंतरही पाणी साचते आणि अनेक भागात गंभीर वाहतूक कोंडी होते अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या. सोमवारच्या पावसानंतर नरसिंहपूर, सेक्टर २९, सेक्टर ३१, सेक्टर ४५, सेक्टर ५६, डीएलएफ फेज ३ मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे.
दरम्यान, परिस्थिती लक्षात घेता गुरुग्राम जिल्हा प्रशासनाने २ सप्टेंबरला सर्व शाळांमध्ये सुट्टी जाहीर केली आहे. ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असून कंपन्यांना घरून काम देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उपायुक्त अजय कुमार यांनी लोकांना ऑरेंज अलर्ट असल्याने घरीच राहण्याचा सल्ला दिला. सोमवारपासून अधूनमधून पाऊस पडत असून अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्यासोबतच मेट्रो सेवा देखील विस्कळीत झाली आहे.