पत्नीच्या प्रियकराला गोळ्या घालून संपवलं, म्हणाला, 'कुणाची पत्नी फसवत असेल तर मला सांगा, मी तिला मारेन'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 13:12 IST2026-02-26T13:02:49+5:302026-02-26T13:12:22+5:30
Uttar Pradesh Crime News: पत्नीच्या अनैतिक संबंधांमुळे संतापलेल्या पतीने तिच्या प्रियकराला भररस्त्यात दिवसाढवळ्या गोळ्या झाडून संपवल्याची धक्कादायक घटना मेरठमधील बहसूमा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामराज भागात बुधवारी दुपारी घडली.

पत्नीच्या प्रियकराला गोळ्या घालून संपवलं, म्हणाला, 'कुणाची पत्नी फसवत असेल तर मला सांगा, मी तिला मारेन'
पत्नीच्या अनैतिक संबंधांमुळे संतापलेल्या पतीने तिच्या प्रियकराला भररस्त्यात दिवसाढवळ्या गोळ्या झाडून संपवल्याची धक्कादायक घटना मेरठमधील बहसूमा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामराज भागात बुधवारी दुपारी घडली. जुना वाद आणि प्रेम प्रकरणामधून आरोपी प्रदीप याने सुरेंद्र उर्फ सुनील याला गोळ्या झाडून ठार मारल्याचे सांगण्यात येत आहे. येथील सनातन धर्म मंदिरासमोर ही घटना घडली. दुचारीवरून आलेल्या हल्लेखोरांनी सुरेंद्रची कंबर आणि कानशिलावर बंदूक रोखून तीन गोळ्या झाडल्या. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी प्रदीप हा खुनाची जबाबदारी घेत पोलीस आणि प्रशासनाला आव्हान देत फरार झाला.
याबाबत मिळालेल्या अधिक माहिती नुसार मृत सुरेंद्र याचे आरोपी प्रदीप याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. सुमारे दीड वर्षापूर्वी ती पतीला सोडून सुरेंद्र याच्यासोबत पळून गेली होती. या दोघांनी कोर्टात जाऊन लग्नही केलं होतं. तसेच ते एकत्र राहत होते. यामुळे संतप्त झालेल्या प्रदीपने बदला घेण्याची शपथ घेतली होती. तसेच त्याने बुधवारी संधी साधून सुरेंद्र याला गाठले. बुधवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास सुरेंद्र हा दुचाकीवरून जात असताना चेहरा लपवलेल्या हल्लेखोराने मागून येऊन त्याच्यावर हल्ला केला आणि गोळ्या झाडल्या. त्यानंतर सुरेंद्र याला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर आरोपी प्रदीप याने एक चार मिनिटांचा व्हिडीओसुद्धा समाजमाध्यमांवर प्रसारित केला आहे. त्यात त्याने आपल्या ‘मौत का खौफ’ या इन्स्टा आयडीचा उल्लेख केला आहे. तसेच मी बदला घेतला आहे, असे म्हटले आहे. तसेच आरोपीने पत्नी आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांनाही जिवे मारण्याची धमकी दिली आहे. मी अडीच मीटरचं कफन सोबत घेऊन फिरतो, मला माझ्या मृत्यूची पर्वा नाही. जर कुणाची पत्नी फसवत असेल तर त्याने मला सांगावं. मी तिला मारेन, असेही तो या व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहे.