'तो' एक सेकंद वाचवून गेला जीव! किरकोळ वाद झाला, पत्नी उडी मारणार तेवढ्यात पतीने हात पकडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 10:58 IST2025-10-16T10:57:51+5:302025-10-16T10:58:28+5:30
एका विवाहितेने चालत्या दुचाकीवरून उडी मारून थेट कालव्यात उडी मारून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.

AI Generated Image
उत्तर प्रदेशातील इटावा येथे एका विवाहितेने चालत्या दुचाकीवरून उडी मारून थेट कालव्यात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. पती-पत्नीत क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडला. मात्र, ऐनवेळी पतीने दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि रस्त्यावरील एका नागरिकाच्या मदतीने महिलेचा जीव वाचला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
माहेरी जाताना झाला वाद
समोर आलेल्या माहितीनुसार, फिरोजाबाद जिल्ह्यातील सिरसागंज येथील पेंगू गावातील रहिवासी मंजू कुमारी ही तिचा पती विकास कुमार आणि सासू यांच्यासोबत भरथना येथील सासरहून सिरसागंज येथील माहेरी जात होती. जसवंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलाजनीजवळ भोगनीपूर गंग नहर पुलावरून जात असताना, दोघांमध्ये कोणत्या तरी किरकोळ गोष्टीवरून वाद झाला.
संतापलेल्या पत्नीने घेतला टोकाचा निर्णय
पती-पत्नीतील वाद विकोपाला गेला आणि अचानक रागाच्या भरात मंजूने चालत्या बाईकवरून खाली उडी मारली. त्यानंतर ती थेट पुलाजवळ गेली आणि कालव्यात उडी मारण्याचा प्रयत्न करू लागली. तिने कालव्यात उडी मारताच, पतीने क्षणाचाही विलंब न लावता धाव घेऊन तिचा हात घट्ट पकडला. यावेळी ती पुलावरून खाली लटकली होती.
पतीने वाचवला पत्नीचा जीव
पती विकास कुमारने ताकद लावून तिला ओढण्याचा प्रयत्न केला, त्याच वेळी पुलावरून जाणाऱ्या एका जागरूक नागरिकानेही तात्काळ धाव घेतली. दोघांनी मिळून मोठ्या प्रयत्नाने मंजूला वर खेचले. जर पतीने एक सेकंदही उशीर केला असता, तर मोठा अनर्थ घडला असता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
पोलिसांनी केले समुपदेशन
घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस स्टेशन प्रभारी कमल भाटी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद झाला होता, याच रागातून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मंजूचे समुपदेशन केले आणि तिला शांत केले. त्यानंतर पोलीस ठाण्यात आणून तिच्या कुटुंबीयांना बोलावण्यात आले.
मंजूला लवकर आणि जास्त राग येतो, त्यामुळेच तिने आवेशात हे कृत्य करण्याचा प्रयत्न केला होता, असे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. सध्या महिला सुरक्षित असून कुटुंबीयांसोबत माहेरी गेली आहे.