हरियाणात मोठा भाजपला झटका, चौधरी देवीलाल यांचे नातू आदित्य चौटाला यांचा INLD मध्ये प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 15:49 IST2024-09-08T15:47:59+5:302024-09-08T15:49:15+5:30
haryana assembly election 2024 : आदित्य चौटाला हे चौधरी देवीलाल यांचे नातू आहेत. २०१४ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला होता

हरियाणात मोठा भाजपला झटका, चौधरी देवीलाल यांचे नातू आदित्य चौटाला यांचा INLD मध्ये प्रवेश
haryana assembly election 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर होताच एका मागोमाग एक असे झटके पक्षाला बसत आहेत. दोन दिवसांपूर्वी तिकीट न मिळाल्याने नाराज असलेल्या रणजीत सिंह चौटाला यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाने तिकीट न दिल्याने आपण राजीनामा दिला असल्याचे रणजीत सिंह चौटाला यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे हरियाणाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
आता आदित्य चौटाला यांनी आयएनएलडीमध्ये (INLD) प्रवेश केला आहे. आदित्य चौटाला यांनी दोन दिवसांपूर्वीच हरियाणा कृषी पणन मंडळाचा राजीनामा दिला होता. INLD आमदार अभय सिंह चौटाला यांनी आदित्य चौटाला यांचा समावेश केला. आदित्य चौटाला आयएनएलडीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता वाढली आहे. यावेळी अभय सिंह चौटाला यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, आयएनएलडी पक्ष सतत वाढत आहे. भाजपचे आणखी बडे नेते आयएनएलडीमध्ये येण्यास उत्सुक आहेत.
दरम्यान, आदित्य चौटाला हे चौधरी देवीलाल यांचे नातू आहेत. २०१४ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. २०१९ मध्ये, भाजप सरकारने त्यांना राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक लिमिटेडचे अध्यक्ष केले होते. चौटाला यांनी दोन दिवसांपूर्वी या पदाचा राजीनामा दिला होता. २०१९ च्या निवडणुकीत आदित्य चौटाला यांनी डबवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा काँग्रेस उमेदवार अमित सिहाग यांच्याकडून पराभव झाला होता.
अभय सिंह चौटाला यांच्या पत्नीचा केला होता पराभव
आदित्य चौटाला यांनी २०१६ च्या पंचायत निवडणुकीत अभय सिंह चौटाला यांची पत्नी कांता चौटाला यांचा पराभव केला आहे. दरम्यान, आदित्य चौटाला यांनी सिरसा जिल्हा परिषदेच्या झोन-४ मधून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत आदित्य चौटाला विजयी झाले होते.