वर्दीतली माणुसकी! एकही पणती विकली गेली नाही; पोलिसांनी 'असं' आणलं आजीच्या चेहऱ्यावर हसू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 11:29 IST2025-10-19T11:28:01+5:302025-10-19T11:29:07+5:30
एक वृद्ध महिला धर्मवती आणि त्यांचा नातू हापूरच्या रस्त्याच्या कडेला मातीच्या पणत्या विकताना दिसले. पण दुपार झाली तरी त्यांची एकही पणती विकली गेली नाही.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशच्या हापूर बाजारात माणुसकीचं दर्शन घडवणारी घटना घडली. दरवर्षीप्रमाणे लोक दिवाळीसाठी पणती खरेदी करण्यात व्यस्त होते. पण याच दरम्यान, एक वृद्ध महिला धर्मवती आणि त्यांचा नातू हापूरच्या रस्त्याच्या कडेला मातीच्या पणत्या विकताना दिसले. पण दुपार झाली तरी त्यांची एकही पणती विकली गेली नाही.
आजीच्या चेहऱ्यावर यामुळे खूप निराशा दिसून येत होती. तिने सांगितलं की, सकाळपासूनच पणत्या घेऊन बसली आहे. परंतु धनत्रयोदशीला एकही ग्राहक आला नाही. हापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी विजय गुप्ता बाजारात गस्त घालत होते आणि निराश झालेल्या आजींना पाहून त्यांनी लगेच तिला मदत करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.
पणत्या खरेदी केल्यानंतर आजींनी अधिकारी आणि त्यांच्या टीमला आशीर्वाद दिला. आजीने सांगितलं की, पोलीस आले आणि त्यांनी मातीच्या पणत्या विकत घेतल्या. मी त्यांना भरपूर आशीर्वाद देते की त्यांचं कुटुंब आनंदी आणि समृद्ध राहो आणि ते नेहमीच खूश राहो. आजीच्या डोळ्यातील चमक आणि आनंदाने बाजारात येणाऱ्यांची मनं जिंकली.
लोकांनीही या घटनेचं भरभरून कौतुक केलं आणि म्हटलं की माणुसकीच्या अशा छोट्या छोट्या कृतींमुळे समाजात आशा निर्माण होते. पोलिसांच्या या कृतीतून हे सिद्ध झालं की, कायदा आणि सुरक्षिततेव्यतिरिक्त पोलिसांना समाजाच्या भावना आणि गरजा देखील समजतात.
पोलीस अधिकारी विजय गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, सण हे प्रेम आणि माणुसकीसाठी देखील असतात. या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. पोलिसांच्या या कृतीचं सर्वच जण कौतुक करत आहेत.