gurugram techie jailed for 13 months develops software | प्रेरणादायी! 13 महिन्यांच्या तुरुंगवासादरम्यान कैद्याने बनवलं जबरदस्त सॉफ्टवेअर; अनेक राज्यांत होतोय वापर

प्रेरणादायी! 13 महिन्यांच्या तुरुंगवासादरम्यान कैद्याने बनवलं जबरदस्त सॉफ्टवेअर; अनेक राज्यांत होतोय वापर

नवी दिल्ली - प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अशक्य वाटणाऱ्या सर्व गोष्टी शक्य होतात. अनेकदा आपल्या क्षेत्रातील आवड, कामाबद्दल असणारं प्रेम आणि काहीतरी करून दाखवण्याची इच्छा विविध गोष्टींसाठी सतत प्रेरणा देत असते. अशीच एक घटना आता समोर आली आहे. तब्बल 13 महिन्यांच्या तुरुंगवासादरम्यान एका कैद्याने सॉफ्टवेअर तयार केलं आहे. अमित मिश्रा (Amit Mishra) असं या कैद्याचं नाव असून तो सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. 13 महिन्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या अमितने या कालावधीमध्ये एक सॉफ्टवेअर (Software) तयार केलं आहे. विशेष म्हणजे तुरुंगात राहून तयार केलेलं हे सॉफ्टवेअर तुरुंगाचं व्यवस्थापन सुधारण्यासंदर्भातील आहे. 

अमितने तयार केलेलं सॉफ्टवेअर पाहून सर्वोच्च न्यायालय आणि इतर वकिलांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यांनीही या कामासाठी अमितचं भरभरून कौतुक केलं आहे. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, काही वर्षांपूर्वी अमितच्या पत्नीने आत्महत्या केली होती. या प्रकरणामध्ये अमितला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला 13 महिन्यांसाठी हरियाणामधील गुरुरुग्राममधील तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं होतं. याच कालावधीत त्याने हे सॉफ्टवेअर तयार केलं. एक वर्ष तुरुंगामध्ये राहिल्यानंतर अमितची निर्दोष मुक्तता करण्यात आली. मात्र तुरुंगात राहून अमितने तयार केलेल्या सॉफ्टवेअरमुळे आता त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

तुरुंगांमधील सुधारणांसाठी हे सॉफ्टवेअर ठरू शकतं फायदेशीर

सर्वोच्च न्यायालयानेही सोमवारी अमितचं कौतुक केलं आहे. न्या. संजय किशन कौल आणि न्या. हेमंत गुप्ता यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने सर्व राज्यांनी अमितने बनवलेलं सॉफ्टवेअर पाहावं असा सल्ला दिला आहे. तुरुंगांमधील सुधारणांसाठी हे सॉफ्टवेअर अत्यंत उपयोगी ठरू शकतं. त्यामुळेच फक्त हरियाणाचा नाही तर देशातील इतर राज्यांनाही या सॉफ्टवेअरचा वापर शक्य आहे का यासंदर्भातील विचार करावा, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. सामान्यपणे कोणालाही आजीवन तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर मरेपर्यंत ती व्यक्ती तुरुंगामध्येच असते. मात्र राज्य सरकार आणि तुरुंग प्रशासनाला अशा व्यक्तींना 14 वर्षांनंतर सोडून देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. 

अनेक राज्यांमध्ये या सॉफ्टवेअरचा होतोय वापर

तुरुंगामधील वागणुकीच्या आधारे यासंदर्भातील निर्णय घेतला जातो. अमितने बनवलेल्या सॉफ्टवेअरमुळे कोणत्याही कैद्यासंदर्भातील रियल टाइम एन्ट्री करता येते. म्हणजेच हा कैदी तुरुंगामध्ये कसा राहतो, काय करतो, इतरांशी कसा वागतो या सर्व गोष्टींची सॉफ्टवेअरच्या मदतीने नोंद ठेवता येणार आहे. या सॉफ्टवेअरला "फिनिक्स" असं नाव देण्यात आलं आहे. सध्या हे सॉफ्टवेअर हरियाणामधील 19 जिल्ह्यांमध्ये वापरलं जात आहे. त्याचबरोबर राजस्थानमधील 38, उत्तर प्रदेशमधील 31 आणि हिमाचल प्रदेशमधील 13 जिल्ह्यांमध्ये या सॉफ्टवेअरची मदत तुरुंग प्रशासनाकडून घेतील जात असल्याची माहिती अमितने दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: gurugram techie jailed for 13 months develops software

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.