चाकूने पोट फाडले, आतडे बाहेर काढले आणि..., आईच्या प्रियकराचा मुलांनी केला निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 09:34 IST2025-01-30T09:32:54+5:302025-01-30T09:34:28+5:30
Gujarat Crime News: अनैतिक संबंधांमधून मुलांनी आईच्या प्रियकराचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील गांधीनगर येथे घडली आहे. येथे दोन भावांनी त्यांच्या आईच्या प्रियकराची चाकूने भोसकून हत्या केली. त्यानंतर त्यांनी मृतदेहाचे आतडे बाहेर काढून हवेत भिरकावले.

चाकूने पोट फाडले, आतडे बाहेर काढले आणि..., आईच्या प्रियकराचा मुलांनी केला निर्घृण हत्या
अनैतिक संबंधांमधून मुलांनी आईच्या प्रियकराचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील गांधीनगर येथे घडली आहे. येथे दोन भावांनी त्यांच्या आईच्या प्रियकराची चाकूने भोसकून हत्या केली. त्यानंतर त्यांनी मृतदेहाचे आतडे बाहेर काढून हवेत भिरकावले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आईसोबत असलेल्या अनैतिक संबंधांना संतापून मुलांनी या व्यक्तीची हत्या केली. मृत रतनजी ठाकोर याचे आरोपी भावांच्या विधवा आईसोबत मागच्या १५ वर्षांपासून अनैतिक संबंध होते. ही बाब या दोघांनाही खटकत होती. या संबंधांमुळे आपल्या दिवंगत वडिलांच्या स्मृतींचा अपमान होत असल्याचं आणि कुटुंबाला लाजिरवाणं व्हावं लागत असल्याचं आरोपींना वाटत होतं. त्यामधूनच संतापून आरोपींनी टोकाचं पाऊल उचलत ठाकोर याचा खून केला.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार ही घटना गुजरातमधील गांधीनगर जिल्ह्यामध्ये २६ जानेवारी रोजी घडली. आरोपी संजय ठाकोर (२७) आणि जयेश ठाकोर (२३) यांनी रतनजी ठाकोर याच्यावर दिवसाढवळ्या लोखंडी रॉडने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यांनी त्याच्या पोटामध्ये चाकू भोसकून मृताचे आतडे बाहेर काढले. मात्र आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत.
आरोपींनी पीडिताचे आतडे बाहेर काढले. तसेच ते हवेमध्ये भिरकावून कापून टाकले. हा क्रूर प्रकार पाहून तिथे उपस्थित असलेले लोकही हादरले. दरम्यान, काही कामगारांनी मृत रतनजी ठाकोर याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आलं नाही.
पेशाने गवंडी असणारा मृत रतनजी ठाकोर याचे आरोपींच्या आईसोबत अनेक वर्षांपासून प्रेमप्रकऱण सुरू होते. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या संबंधांमुळे कुटुंबांना शरमेने मान खाली घालावी लागत असल्याने दोन्ही भावांना हे संबंध मान्य नव्हते. दरम्यान, मयत रतनजी ठाकोरचा मुलगा अजय याने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्याने पोलिसांना सांगितले की, आरोपींनी माझ्या वडिलांना त्यांच्या आईपासून लांब राहण्याचा इशारा दिला होता. तसेच त्यांचं या विषयावरून माझ्या वडिलांसोबत अनेकदा भांडणही झालं होतं.
दरम्यान, या प्रकरणी आधी गावात पंचायतही बोलावण्यात आली होती. मात्र त्यामधून कुठलाही तोडगा निघाला नव्हता. रतनजी ठाकोर याची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. मात्र मोबाईल लोकेशनच्या आधारावर पोलिसांनी त्यांना शोधून काढले आणि अटक केली. या गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारेही ताब्यात घेण्यात आली असून, आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.