Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 19:32 IST2025-10-16T19:29:01+5:302025-10-16T19:32:25+5:30
Gujarat Cabinet Reshuffle: गुजरातमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार याची चर्चा होती. नवीन लोकांना संधी दिली जाणार असल्याचेही बोलले होते. पण, भाजपने नेहमीप्रमाणे धक्कातंत्र अवलंबले. मुख्यमंत्री वगळता सर्वच मंत्र्यांचे राजीनामे घेतले.

Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
Gujarat Cabinet Expansion: गुजरातमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराला वेग आला. गुरुवारी भाजपने मुख्यमंत्री वगळून सर्वच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतले. त्यानंतर आता उद्या (१७ ऑक्टोबर) मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून, नव्या मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा असून, दोन उपमुख्यमंत्रीही बनवले जाणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदारांना मंत्रिमंडळात संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
गुजरात सरकारमध्ये मुख्यमंत्री पटेल यांच्यासह १७ मंत्री होते. यात ८ कॅबिनेट, तर ८ राज्यमंत्री होते. गुजरात विधानसभेतील आमदारांची संख्या १८२ असून, तिथे २७ मंत्र्यांचे मंत्रिमंडळ बनवता येते. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात २५ ते २६ जणांना शपथ दिली जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
भाजपने सर्वच मंत्र्यांचे राजीनामे का घेतले?
भाजपने इतका मोठा निर्णय घेण्याचे प्रमुख कारण अनेक मंत्री पक्षाच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेले नाहीत. अनेक मंत्र्यांच्या कामावर पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व नाराज आहे. त्यात आणखी एक बाब म्हणजे अलिकडेच गुजरातमधील विसावदर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत जिंकण्यासाठी भाजपने सर्वशक्ती पणाला लावली होती. मुख्यमंत्री, भाजप प्रदेशाध्यक्षांसह बरेच नेते मतदारसंघात होते. पण, तरीही आपचे गोपाल इटालिया हे विजयी झाले. त्याचाही परिणाम मंत्रिमंडळ विस्तारावर झाला असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
भाजपने पूर्णपणे मंत्रिमंडळ विस्तार करण्याचे आणखी एक कारण सांगितले जात आहे सत्ता विरोधी लाट. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाल्यापासून गुजरातमध्ये भाजपचे सरकार आहे. त्यानंतर गुजरातमध्ये भाजपने नेतृत्वात अनेक बदल केले आहेत. आनंदीबेन पटेल आणि विजय रुपाणी यांच्या सरकारमध्येही अचानक राजीनामे घेतले गेले होते.
असे निर्णय भाजपकडून अशा वेळी घेतले गेले आहेत, जेव्हा जेव्हा सत्ता विरोधी लाट होत असल्याची जाणीव झाली. आता गुजरातमध्ये जानेवारीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सत्ता विरोधी सुप्त लाटेचा परिणाम निकालावर होणार नाही, याची खबरदारी म्हणून भाजपने हा निर्णय घेतला असा असे राजकीय अभ्यासकाचे मत आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने पोटनिवडणुकीत भाजपला पराभव दाखवला. हा पराभव पक्षाने गांभीर्याने घेतला आहे. त्यामुळे पुढील काळात भाजप कोणताही धोका पत्करण्यास तयार नाहीये. भाजपमध्ये जे शक्तीशाली नेते आहेत, पण ते बऱ्याच काळापासून बाजूला गेले आहेत. त्यांना भाजपकडून पुन्हा सत्तेच्या मुख्य प्रवाहात आणण्याची तयारी असू शकते. अधिक फटका बसू नये म्हणून जुन्या नेत्यांना संधी देण्यासाठीही हा निर्णय घेतला असावा, असेही सूत्रांनी सांगितले.