सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 09:01 IST2025-10-03T09:00:55+5:302025-10-03T09:01:17+5:30
आंतरराष्ट्रीय स्थितीमुळे सोन्याचा भाव तेजीत असतानाही दसऱ्याच्या मुहूर्तावर गुरुवारी सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून आला.

सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
मुंबई : आंतरराष्ट्रीय स्थितीमुळे सोन्याचा भाव तेजीत असतानाही दसऱ्याच्या मुहूर्तावर गुरुवारी सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून आला. सकाळी खरेदीत फारसा उत्साह नव्हता. मात्र मात्र दुपारनंतर सराफा बाजारात खरेदीची रेलचेल दिसून आली.
मागील वर्षी दसऱ्याला सोने खरेदी तेजीत होती, अशी माहिती जेम्स अँड ज्वेलरीचे प्रवक्ते कुमार जैन यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत दिवसागणिक वाढ होत आहे. प्रति तोळा दिवसाला किमान पाचशे रुपयांची वाढ होत आहे. दसऱ्याला एक तोळे सोन्याचा भाव एक लाख २४ हजार होता. तर तुलनेत चांदीही भाव खाऊन गेली. चांदीचा भाव एका किलोला एक लाख ५४ हजार होता. बुधवारी हाच भाव अनुक्रमे एक लाख २१ हजार आणि एक लाख ५२ हजार असा होता. सोन्याच्या दरात होत असलेल्या वाढीमुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर किती उलाढाल होईल याकडे लक्ष लागून राहिले होते.
दुपारपर्यंत खरेदीदारांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही त्यामुळे यंदा चांगली उलाढाल होईल की नाही याबाबत शंका होती, असे जैन यांनी सांगितले. संध्याकाळच्या सुमारास खरेदीदारांचा ओघ वाढला आणि बाजारात उत्साह आला, असे त्यांनी सांगितले.
नाणी नको, दागिन्यांवर भर
आगामी काळात लग्नसराईचा हंगाम आहे. भविष्यातील सोन्याच्या दरवाढीचे संकेत लक्षात घेता लग्नसराईची खरेदी आणि नोंदणी आत्ताच करून घेण्यावर ग्राहकांचा भर दिसला. सोन्याचे कडे, ब्रेसलेट, बाजूबंदांची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली. मंगळसूत्रांची मागणीही मोठ्या प्रमाणावर नोंदवण्यात आली. दाग-दागिन्यांसोबत सोन्याची नाणी घेण्यावर ग्राहकांचा दरवर्षी भर असतो. यंदा मात्र हा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर दिसून आला नाही. त्यापेक्षा दागिने खरेदीवर अधिक भर असल्याचे दिसून आले.
गुरुवारी सोने, चांदीचा भाव
१.२४ लाख रुपये एक तोळे सोन्याचा भाव
१.५४ लाख रुपये एक किलो चांदीचा भाव
वाहन खरेदी सुसाट
नवरात्र आणि दसऱ्याच्या सणासुदीच्या मुहूर्तावर मुंबईमध्ये वाहन खरेदीला चांगलाच उत्साह दिसून आला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा वाहन नोंदणीत तब्बल १४ टक्क्यांची वाढ झाली. मुंबईतील विविध आरटीओ कार्यालयांत मोठ्या प्रमाणावर गाड्यांची नोंदणी होत असून कार आणि दुचाकी या दोन्ही वर्गांतील खरेदीत लक्षणीय वाढ झाली आहे. केंद्र सरकारने वाहनांवरील जीएसटी दर कमी केला असून घटस्थापनेपासून म्हणजेच २२ सप्टेंबरपासून नवे दर लागू झाले आहेत. परिणाम यंदा नवरात्री आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदीला उधाण आले. जीएसटी कराच्या नव्या रचनेनुसार ३५० हून कमी सीसी असलेल्या बाइक आणि १,२०० हून कमी सीसीच्या चारचाकी वाहनांच्या खरेदीत वाढ झाली. या वाहनांच्या किमती २० हजार ते सव्वा लाख रुपयांनी कमी झाल्या आहेत. विक्रेत्यांनुसार ग्राहकांकडून लहान गाड्यांची मागणी वाढली आहे.
दुचाकींची सर्वाधिक खरेदी
नवरात्रोत्सव काळामध्ये मुंबईतील चारही आरटीओमध्ये १०,५४१ वाहनांची नोंदणी झाली असून त्यामध्ये सर्वाधिक दुचाकी वाहनांची संख्या आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी १४७३ वाहनांची नोंदणी अधिक झाली आहे.