'काँग्रेसला पीएम मोदींची हत्या करायची आहे', केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 15:22 IST2023-03-14T15:21:50+5:302023-03-14T15:22:16+5:30
Parliament Budget Session: 'काँग्रेस नेते आधी मोदींना शिव्या द्यायचे, आता त्यांचा खात्मा करण्याची भाषा वापरत आहेत.'

'काँग्रेसला पीएम मोदींची हत्या करायची आहे', केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचा गंभीर आरोप
Giriraj Singh On PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली होती. त्यावरुन मोठा वादही झाला होता. यातच आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी काँग्रेस पक्षावर मोठा आरोप केला आहे. 'काँग्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदींना ठार मारायचे आहे,' असा आरोप त्यांनी केला आहे.
माध्यमांशी बोलताना गिरिराज सिंह म्हणाले, 'नरेंद्र मोदींना शिव्या देण्यासाठी अदानी फक्त बहाणा आहे. दहा वर्षे त्यांचे सरकार वादात अडकले होते. गेल्या 10 वर्षांपासून देशाला मोदी सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आता हे लोक म्हणत आहेत की, मोदींचा खात्मा झाला तरच हे सरकार संपेल. हे लोक आधी शिव्या द्यायचे, मोदींना मृत्यूचा व्यापारी म्हणायचे, आता मारण्याची तयारी करत आहेत.'
गिरिराज सिंह पुढे म्हणतात, 'पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार होते, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर गेले होते. त्यावेळेस त्यांना उड्डाणपुलावर थांबवण्यात आले आणि मारण्याची सर्व तयारी केली होती. आता काँग्रेस त्यांच्या मृत्यूवर चर्चा करत आहे. त्यांचे नेते आता थेट पंतप्रधानांचा खात्मा करण्याची भाषा वापरत आहेत.'
राहुल गांधींवर भारताचा अपमान केल्याचा आरोप
सोमवारी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला होता. राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन भारताचा अपमान केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. 'राहुल गांधी यांनी परदेशी भूमीवर जाऊन भारताचा, भारतीय लोकशाहीचा आणि भारतीय संसदेचा अपमान केला आहे. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे,' असं ते म्हणाले होते.