वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात, नवऱ्या मुलाच्या वडिलांसहीत 7 जणांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2018 11:26 IST2018-04-21T09:13:36+5:302018-04-21T11:26:53+5:30
लग्नघरात घडली दुर्दैवी घटना, वरातीऐवजी निघणार अंत्ययात्रा

वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात, नवऱ्या मुलाच्या वडिलांसहीत 7 जणांचा जागीच मृत्यू
नवी दिल्ली : ज्या घरातून वरात निघणार होती, तेथून आता अंत्ययात्रा निघणार आहेत. राजधानी नवी दिल्लीपासून काही अंतरावर असलेल्या गाजियाबादमध्ये लग्नसोहळ्याचा उत्सव सुरू होता. मात्र वऱ्हाडांनी भरलेली टाटा सूमो एका नाल्यात कोसळल्यानं भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातामध्ये नवऱ्या मुलाच्या वडिलांसहीत 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी संध्याकाळी गाजियाबादमधील अकबरपूर बेहरामपूर येथील रहिवासी रवी रस्तोगीच्या (वय 21 वर्ष) लग्नाचं वऱ्हाड मोठ्या थाटामाटात नोएडाच्या दिशेनं निघाले होते. रवीनं वडिलांचे आशीर्वाद घेतले आणि यानंतर त्याचे वडील जवळपास 12 नातेवाईकांसोबत टाटा सूमोमध्ये पुढील प्रवास करण्यासाठी बसले. त्यांची गाडी राष्ट्रीय महामार्गापर्यंत पोहोचली,गाडी चढण चढणार होती. मात्र कार जाम झाल्यानं चालकानं ती मागे घेतली व तो मोबाइलवर बोलू लागला. पण यामुळे कार हळू हळू मागे सरकत गेली आणि 20 फूट खोल नाल्यात कोसळून भीषण अपघात झाला.
नवऱ्या मुलाच्या वडिलांचा मृत्यू
मृतांमध्ये नवऱ्या मुलाचे वडील दुर्गा प्रसाद रस्तोगी यांचाही जागीच मृत्यू झाला आहे. शिवाय, इंद्र प्रकाश रस्तोगी आणि त्यांच्या मोठ्या मुलाच्या संपूर्ण कुटुंबीयांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर बऱ्याच वेळानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 100 क्रमांकावरही संपर्क होऊ शकला नाही. यामुळे मृतांचा आकडा वाढल्याचा आरोप करण्यात येत आहे.