'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 23:15 IST2025-05-18T23:11:58+5:302025-05-18T23:15:49+5:30
आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांच्यावर पाकिस्तानशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर गोगोईंनीही सरमांना उत्तर दिले.

'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांच्या सोशल मीडियावर जोरदार खडाजंगी झाली. झालं असं की, मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी गौरव गोगोई यांच्यावर पाकिस्तानच्या गृह मंत्रालय आणि आयएसआयने निमंत्रित केल्याचा आरोप केला. इतकंच नाही, तर तिथे काही संशयास्पद ट्रेनिंग घेतल्याचेही ते म्हणाले. या आरोपांवर बोलताना खासदार गोगोईंनी मुख्यमंत्री सरमा यांच्या मानसिक संतुलनाबद्दलच प्रश्न करत टीका केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हिमंता बिस्वा सरमा म्हणालेले की, 'मी पूर्ण जबाबदारीने हे बोलत आहे की, आसामचे खासदार गौरव गोगोई यांनी पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाच्या निमंत्रणावरून तिथे गेले आणि तिथे अनेक दिवस राहिले. आम्हाला त्यांच्या दौऱ्यातील घटनांची चौकशी करत आहोत. आमच्याकडे याबद्दलचे कागदोपत्री पुरावे आहेत."
जनतेला पुरावे दाखवणार
मुख्यमंत्री सरमा म्हणाले, 'हे पुरावे १० सप्टेंबरपर्यंत जनतेसमोर मांडले जातील. गौरव गोगोई यांनी पर्यटनासाठी नाही, तर ट्रेनिंगसाठी पाकिस्तानचा दौरा केला होता. ही महत्त्वाची आणि भयंकर गोष्ट आहे."
पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाकडून निमंत्रण मिळणे, यातून हे सिद्ध होते की गोगोईंचे पाकिस्तानसोबत जवळचे संबंध आहेत, असा दावाही सरमा यांनी केला.
सरमा यांच्या आरोपांवर गोगोई काय बोलले?
खासदार गौरव गोगोई यांनी मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांचे आरोप फेटाळून लावले. "मला मुख्यमंत्र्यांच्या मानिसक आरोग्याची चिंता वाटत आहे. मागील १३ वर्षांपासून मी त्याच्या निशाण्यावर आहे आणि नेहमी बिनबुडाचे आरोप केले गेले आहेत. आता त्यांचे नवीन विधान वेडेपणाचा कळस आहे. आम्ही २०२६ नंतर त्यांच्या भल्यासाठी काम करू."
"मुख्यमंत्री जे काही बोलत आहे, ते ९९ टक्के बाष्कळ आहे. त्यांनी वस्तुस्थिती जनतेसमोर आणली पाहिजे आणि सप्टेंबरच्या काल्पनिक वेळमर्यादेच्या मागे लपणे बंद केले पाहिजेत. मला शंका आहे की, ते सप्टेंबरमध्येही कोणतेही ठोस पुरावे मांडली शकतील", असे उत्तर गोगोईंनी दिले.