गॅस चेंबर अन् भीषण स्फोट! DMRC इंजिनिअरचं कुटुंब झोपेतच संपलं; काळजाचा थरकाप उडवणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 10:25 IST2026-01-07T10:25:20+5:302026-01-07T10:25:37+5:30
अजय विमल हे दिल्ली मेट्रोमध्ये असिस्टंट सेक्शन इंजिनिअर होते. ते २०१६ पासून या क्वार्टरमध्ये आपल्या कुटुंबासह राहत होते.

गॅस चेंबर अन् भीषण स्फोट! DMRC इंजिनिअरचं कुटुंब झोपेतच संपलं; काळजाचा थरकाप उडवणारी घटना
थंडीपासून बचाव करण्यासाठी लावलेला हिटर किंवा ब्लोअर कधी मृत्यूचा सापळा बनेल, याचा विचारही या कुटुंबाने केला नसेल. दिल्लीतील मजलिस पार्क मेट्रो स्टेशनजवळील DMRC अपार्टमेंटमध्ये मंगळवारी पहाटे एका भीषण आगीत मेट्रो इंजिनिअर अजय विमल (४२), त्यांची पत्नी नीलम (३८) आणि मुलगी जाह्नवी या तिघांचाही होरपळून आणि गुदमरून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण सोसायटीत शोककळा पसरली असून सुरक्षा मानकांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
नेमकं काय घडलं?
मूळचे मध्य प्रदेशातील उज्जैनचे रहिवासी असलेले अजय विमल हे दिल्ली मेट्रोमध्ये असिस्टंट सेक्शन इंजिनिअर होते. ते २०१६ पासून या क्वार्टरमध्ये आपल्या कुटुंबासह राहत होते. मंगळवारी पहाटे २.३०च्या सुमारास सोसायटीतील रहिवाशांना एका मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकू आला. सुरुवातीला अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केले, पण थोड्याच वेळात पाचव्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीतून आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या.
'गॅस चेंबर'मुळे गुदमरला श्वास
फायर ब्रिगेड आणि पोलिसांनी घराचा सेंट्रल लॉक तोडून आत प्रवेश केला, तेव्हा बेडरूममध्ये तिघांचेही मृतदेह आढळले. धक्कादायक बाब म्हणजे, आग संपूर्ण फ्लॅटमध्ये पसरली नव्हती, ती फक्त बेडरूमपुरती मर्यादित होती. प्राथमिक अंदाजानुसार, खोलीत हिटर किंवा ब्लोअरमुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असावी. या आगीमुळे खोलीत प्रचंड प्रमाणात कार्बन मोनोऑक्साइड जमा झाला. खिडक्या आणि दरवाजे बंद असल्याने खोलीचे रूपांतर गॅस चेंबरमध्ये झाले आणि झोपेत असलेल्या या कुटुंबाला शुद्ध हरपल्यामुळे दरवाजा उघडण्याची संधीच मिळाली नाही.
कुटुंबाचा आक्रोश, शेजारी सुन्न
अजय यांचे मोठे भाऊ मनोज हे यूपी पोलिसात इन्स्पेक्टर आहेत, तर बहीण उषा नोएडामध्ये राहते. या दुर्घटनेची बातमी कळताच दोन्ही भावंडांनी रुग्णालयात धाव घेतली. आपल्या भावाचं हसतं-खेळतं कुटुंब असं अचानक संपलेलं पाहून त्यांनी हंबरडा फोडला. शेजाऱ्यांनी सांगितले की, सोमवारी रात्रीच त्यांच्याशी गप्पा झाल्या होत्या, तेव्हा सर्व काही सुरळीत होतं. अवघ्या काही तासांत काळ असा घाला घालेल, याची कोणालाच पुसटशी कल्पना नव्हती.
सुरक्षेचे नियम धाब्यावर?
DMRC अपार्टमेंट्समधील सुरक्षेबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, मेट्रो प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळले असून, सर्व फ्लॅट्समध्ये वेंटिलेशन आणि अग्निशमन यंत्रणा सरकारी नियमांनुसार असल्याचा दावा केला आहे. गॅस चेंबरमुळे झालेल्या स्फोटाचा अधिक तपास दिल्ली पोलीस करत आहेत.