हसतं खेळतं घर उद्ध्वस्त! बसच्या भीषण आगीत कुटुंब संपलं; आई-वडिलांसह २ मुलांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 11:31 IST2025-10-24T11:30:12+5:302025-10-24T11:31:00+5:30
Kurnool Bus Fire Accident : एका खासगी बसला आग लागल्याने २० जणांचा मृत्यू झाला. कल्लूर विभागातील चिन्नाटेकुर जवळ हैदराबाद-बंगळुरू महामार्गावर हा अपघात झाला.

फोटो - nbt
Kurnool Bus Fire Accident: आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे एक मोठी दुर्घटना घडली. एका खासगी बसला आग लागल्याने २० जणांचा मृत्यू झाला. कल्लूर विभागातील चिन्नाटेकुर जवळ हैदराबाद-बंगळुरू महामार्गावर हा अपघात झाला. बस बंगळुरूहून हैदराबादला जात असताना अचानक भीषण आग लागली. काही वेळातच संपूर्ण बस जळून खाक झाली. या अपघातात नेल्लूर जिल्ह्यातील एका कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पती, पत्नी आणि दोन निष्पाप मुलांचा समावेश आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, व्ही कावेरी ट्रॅव्हल्स बसमध्ये प्रवास करणारे रमेश (३७), त्याची पत्नी अनुषा (३२), मुलगा मनीष (१२) आणि मुलगी मनिथवा (१०) यांचा कुर्नूल बसला लागलेल्या आगीत मृत्यू झाला. रमेश गेल्या १५ वर्षांपासून बंगळुरूमध्ये एका खासगी कंपनीत काम करत होते. ते त्याच्या कुटुंबासह सहलीसाठी हैदराबादला गेले होते.
२० जणांचा मृत्यू, अनेक जखमी
हैदराबादहून पतत असताना, कुर्नूल जिल्ह्यातील चिन्नाटेकुर येथे राष्ट्रीय महामार्ग ४४ वर एका बाईकची बसशी टक्कर झाली आणि अपघात झाला. या घटनेत २० जण जिवंत जळाले, तर काही जणांनी खिडकीच्या काचा फोडून बसमधून उड्या मारत आपला जीव वाचवला. जखमींवर कुर्नूल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसमध्ये ४१ प्रवासी होते.
१२ प्रवासी बाहेर पडण्यात यशस्वी
आपत्कालीन दरवाजा तोडून सुमारे १२ प्रवासी बाहेर पडण्यात यशस्वी झाले, तर काही जण आगीत भाजले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. कुर्नूलचे जिल्हाधिकारी डॉ. ए. सिरी यांनी सांगितलं की, हा अपघात पहाटे ३ च्या दरम्यान घडला जेव्हा बस एका बाईरला धडकली, ज्यामुळे इंधन गळती झाली आणि आग लागली. ४१ प्रवाशांपैकी २१ प्रवाशांना सुरक्षितपणे वाचवण्यात आलं.