Atal Bihari Vajpayee: अटलबिहारी वाजपेयींना नेमका काय आजार आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 12:27 PM2018-08-16T12:27:06+5:302018-08-16T16:18:50+5:30

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींची प्रकृती फार नाजूक आहे. ते 93 वर्षांचे आहेत. त्यांना एम्स रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

former prime minister atal bihari vajpayee serious is suffering from these diseases | Atal Bihari Vajpayee: अटलबिहारी वाजपेयींना नेमका काय आजार आहे?

Atal Bihari Vajpayee: अटलबिहारी वाजपेयींना नेमका काय आजार आहे?

नवी दिल्लीः भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींची प्रकृती फार नाजूक आहे. ते 93 वर्षांचे आहेत. त्यांना एम्स रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. फार पूर्वीच अटलजींना डिमेंशियासारख्या आजाराने ग्रासले होते. या व्यतिरिक्त ते  किडनीच्या आजारानं त्रस्त आहेत. अटलजींवर 11 जून 2018 पासून एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण गेल्या 24 तासांमध्ये त्यांची प्रकृती अधिकच खाल्यावल्याचे एम्सकडून सांगण्यात आले आहे.

डिमेंशिया म्हणजे काय?

डिमेंशिया म्हणजे एक असा आजार ज्यामध्ये व्यक्तीची स्मरणशक्ती हळूहळू कमी होत जाते. यामध्ये व्यक्ती स्वतःची रोजची कामंही नीट करू शकत नाही. डिमेंशिया झालेल्या व्यक्तींमध्ये अनेकदा शॉर्ट टर्म मेमरी लॉससारखी लक्षणं पाहायला मिळतात. डिमेंशिया झालेल्या व्यक्तीमध्ये 60 ते 80 टक्के केसेस या अल्झायमरच्या असतात. डिमेंशिया झालेल्या व्यक्तींच्या स्वभावातही अनेक बदल होतच राहतात. अशा व्यक्ती सतत उदास आणि दुःखी असतात. डिमेंशिया झालेल्या व्यक्तीची प्रकृती दिवसेंदिवस खालावते. डिमेंशिया झालेल्या व्यक्ती अनेकदा सामान्य व्यक्तींपेक्षा विचित्र वागू लागतात. एकच प्रश्न सतत विचारणं, सतत रागावणं, सतत तणावामध्ये राहणं यांसारखी लक्षणं त्यांच्यामध्ये दिसू लागतात. 

डिमेंशियाची लक्षणं -

- या व्यक्तींना आपलं नाव, ठिकाणं, एखाद्या व्यक्तीसोबत सुरू असलेलं बोलणं लक्षात ठेवताना अनेक अडचणी येतात. 

- सतत उदास राहणं

- एखाद्याशी बोलताना त्रास होणं

-  वागण्यात बदल होतात. 

- एखादी गोष्ट खाताना अथवा खात असलेला घास गिळताना त्रास होणं.

- चालताना, फिरताना त्रास होणं

-  एखादी गोष्ट ठेवून विसरून जाणं

वाजपेयी किडनी संक्रमणामुळे त्रस्त

अटलजी यूरिन इन्फेक्शन आणि किडनीच्या आजारानं त्रस्त आहेत. त्यांची एकच किडनी काम करत आहे. 11 जून रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचं डायलिसिस करण्यात आलं होतं. त्यानंतर बुधवारी रात्री त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं. मधुमेहाने त्रस्त असलेले अटलजी भारताचे माजी पंतप्रधान आणि BJPचे ज्येष्ठ नेते आहेत. 2009मध्ये त्यांना स्ट्रोक आल्यानंतर त्यांची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता फार कमी झाली. त्यात डिमेंशियाने त्रस्त असल्यामुळे त्यांची प्रकृती हळूहळू खालावत गेली. त्यानंतर अटलजींनी स्वतःला सार्वजनिक जीवनापासून दूर ठेवलं. 

दरम्यान , अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, सुरेश प्रभू, स्मृती इराणी यांच्यासह इतर नेत्यांनीही एम्समध्ये जाऊन वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 50 मिनिटे एम्स रुग्णालयात होते. पंतप्रधानांनंतर केंद्रीय मंत्र्यांनीही रुग्णालयात जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे.

Web Title: former prime minister atal bihari vajpayee serious is suffering from these diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.