काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 22:22 IST2025-10-18T22:22:34+5:302025-10-18T22:22:57+5:30
Harish Ravat Car Accident: उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिश रावत यांच्या कारला आज मोठा अपघात झाला. सुदैवाने हरिश रावत हे या अपघातातून बालंबाल बचावले. हा अपघात दिल्ली-देहराडून बायपासवर झाला.

काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिश रावत यांच्या कारला आज मोठा अपघात झाला. सुदैवाने हरिश रावत हे या अपघातातून बालंबाल बचावले. हा अपघात दिल्ली-देहराडून बायपासवर झाला. हरिश रावत यांच्या ताफ्यामधील कार एका एस्कॉर्ट वाहनावर आदळली. महिला कारचालकाने अचानक ब्रेक लावल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपघातातनंतर हरिश रावत हे दुसऱ्या वाहनात बसून रवाना झाले. तर या अपघातात एक शिपाई जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिश रावत हे आज संध्याकाळी दिल्लीहून देहराडूनला जात होते. त्यावेळी मेरठच्या सीमेपासून त्यांना पोलिसांनी एस्कॉर्ट पुरवले होते. एस्कॉर्टच्या मागून माजी मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा जात होता. दिवाळीचे दिवस असल्याने रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ होती. दरम्यान, एमआयजी कॉलेजसमोर एस्कॉर्टने अचानक ब्रेक लावल्याने हरिश रावत यांची कार त्या एस्कॉर्ट वाहनावर जाऊन आदळली. या अपघातात रावत यांच्या कारच्या समोरच्या भागाचं नुकसान झालं. सुदैवाने या अपघातानंतर मुख्यमंत्री हरिश रावत हे पूर्णपणे स्वस्थ आहेत. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनाला एके ठिकाणी उभं करून ठेवलं असून, रावत यांना दुसऱ्या वाहनातून उत्तराखंडकडे रवाना करण्यात आलं आहे.