लोकगायिका नेहा सिंह राठोड झालीय बेपत्ता? संपर्क नाही, नोटिशीला उत्तरही नाही, पोलीस घेताहेत शोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 10:51 IST2025-11-27T10:50:14+5:302025-11-27T10:51:15+5:30
Neha Singh Rathore News: आपल्या बिनधास्त आणि आक्रमक राजकीय भूमिका आणि वक्तव्यांमुळे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडणारी प्रसिद्ध भोजपुरी लोकगायिका नेहा सिंह राठोड हिच्यासमोरील अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे.

लोकगायिका नेहा सिंह राठोड झालीय बेपत्ता? संपर्क नाही, नोटिशीला उत्तरही नाही, पोलीस घेताहेत शोध
आपल्या आक्रमक राजकीय भूमिका आणि वक्तव्यांमुळे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडणारी प्रसिद्ध भोजपुरी लोकगायिका नेहा सिंह राठोड हिच्यासमोरील अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. नेहा सिंह राठोड हिचा शोध घेण्यासाठी वाराणसी पोलीस लखनौ येथील तिच्या निवासस्थानी पोहोचली होती. मात्र तिथे ती सापडली नाही. त्यानंतर पोलीस नोटिस तिच्या घराच्या दारावर चिकटवून माघारी फिरले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनरल डायर म्हटल्याने भाजपाचे कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी संघटनांनी वाराणसीमध्ये नेहा सिंह राठोड विरोधात ५०० हून अधिक तक्रारी दाखल केल्या होत्या. तसेच या प्रकरणी लंका पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. याच प्रकरणी लखनौ पोलिसांसोबत वाराणसी पोलीस नेहा सिंह राठोडच्या सुशांत गोल्फ सिटीच्या सेलिब्रिटी गार्डन्स अपार्टमेंटमध्ये असलेल्या फ्लॅटवर गेले होते.
याबरोबर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत केलेल्या कथित चिथावणीखोर पोस्टप्रकरणी नेहा सिंह राठोडविरोधात लखनौमध्ये एक गुन्हा नोंद झालेला आहे. लखनौ पोलीससुद्धा जबाब नोंदवण्यासाटी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी पोलिसांनी दोन वेळा तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र आतापर्यंत ती जबाब नोंदवण्यासाठी आलेली नाही. दुसरीकडे हजरतगंज पोलिसांनीही नेहा सिंह राठोड हिला दोन वेळा नोटिस बजावत चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र ती हजर झालेली नाही.
या दरम्यान, नेहा सिंह राठोड हिने कोर्टामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. मात्र ती कोर्टातही जबाब नोंदवण्यासाठी आलेली नाही. सूत्रांच्या मते दोन शहरांमधील पोलीस तिला पकडण्यासाठी धाडी घालत आहेत. तसेच तिला लवकरात लवकर ताब्यात घेऊन चौकशी केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. नेहा सिंह राठोड ही आपली गाणी आणि सोशल मीडिया पोस्टमधून सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर आपली रोखठोक मते व्यक्त करत असतेल. त्यामुळे ती अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही सापडते. आता या प्रकरणी नेहा सिंह राठोड हिचं अधिकृत वक्तव्य समोर आलेलं नाही.