Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 10:22 IST2025-08-24T10:22:05+5:302025-08-24T10:22:57+5:30

Rajasthan Flood : राजस्थानमधील आठ जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोटा, सवाई माधोपूर, टोंक आणि बुंदी येथील लोकांना सर्वात जास्त त्रास होत आहे.

flood situation rajasthan 8 districts army sdrf ndrf engaged relief rescue work | Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात

Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात

राजस्थानमधील आठ जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोटा, सवाई माधोपूर, टोंक आणि बुंदी येथील लोकांना सर्वात जास्त त्रास होत आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. सध्या एसडीआरएफ, एनडीआरएफसोबत मदत आणि बचावकार्यासाठी सैन्य देखील तैनात करण्यात आलं आहे.

पावसामुळे सवाई माधोपूर आणि बुंदी येथे अनेक समस्या येत आहेत. सवाई माधोपूरमध्ये ३० हून अधिक गावं पाण्याखाली गेली आहेत. या गावांचा मुख्य शहराशी संपर्क तुटला आहे. राजस्थानला मध्य प्रदेशशी जोडणारा महामार्गही पुरामुळे पाण्याखाली गेला. सवाई माधोपूरमध्येही सैन्य तैनात करण्यात आलं आहे. एक लाखाहून अधिक लोकांना पुराचा मोठा फटका बसला आहे. 

दोन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सवाई माधोपूर जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती कायम आहे. एनडीआरएफची टीम वेगवेगळ्या भागात पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी सतत वेगवेगळ्या भागात जात आहे. पण शनिवारी संपूर्ण एनडीआरएफ टीम पूरग्रस्त भागात अपघाताचा बळी ठरली.

एनडीआरएफ टीम ट्रॅक्टर-ट्रॉलीने पूरग्रस्त भागात जात होती. मात्र अचानक ट्रॅक्टर ट्रॉलीचा तोल गेला आणि गाडी पलटून ती रस्त्यावरील खड्ड्यात पडली. एनडीआरएफच्या जवानांनी कठीण परिस्थितीतही संयम राखून धाडस दाखवलं आणि आपल्या एका जवानाला सुरक्षितपणे वाचवलं. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. एनडीआरएफच्या जवानांना किरकोळ दुखापत झाली आहे.

सवाई माधोपूरमध्ये, जिल्हा मुख्यालयातील लाटिया नाला पावसामुळे पूर्णपणे भरून गेला आहे. याच दरम्यान लाटिया नाल्याच्या जोरदार प्रवाहात एक कार अडकली. कारमध्ये चालकासह दोन महिला होत्या, ज्यांना जवळच्या लोकांनी मोठ्या कष्टाने कारमधून बाहेर काढलं. यानंतर, ट्रॅक्टरच्या मदतीने गाडीही बाहेर काढण्यात आली.

Web Title: flood situation rajasthan 8 districts army sdrf ndrf engaged relief rescue work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.