आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 12:11 IST2025-07-03T12:10:26+5:302025-07-03T12:11:13+5:30
Rajasthan Crime News: राजस्थानमधील बाडमेर येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथे एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन मुलं अशा चार जणांनी पाण्याच्या टाकीत उडी मारून जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे.

आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
राजस्थानमधील बाडमेर येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथे एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन मुलं अशा चार जणांनी पाण्याच्या टाकीत उडी मारून जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे. ही हृदयद्रावक घटना शिव ठाणे क्षेत्रातील उंडू गावातील ब्राह्मणांची ढाणी येथे मंगळवारी संघ्याकाळी घडली.
या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावं शिवलाल (३५), त्यांची पत्नी कविता (३२), आणि त्यांची दोन मुलं यांचा समावेश आहे. या मुलांची नावं बजरंग आणि रामदेव अशी असल्याचं सांगण्यात येत आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवलाल याने आधी आपल्या घराला कुलूप लावलं. त्यानंतर संपूर्ण कुटुंबासह घराबाहेर असलेल्या पाण्याच्या टाकीत उडी मारली. शिवलाल याच्या धाकट्या भावाने त्याला अनेकदा फोल लावल्यानंतरही तो उचलला गेला नाही. त्यानंतर त्याने शेजारी आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.
दरम्यान, जीवन संपवण्यापूर्वी शिवलाल यांची पत्नी कविता यांनी त्यांचा मुलगा रामदेव याला नववधूसारखं सजवलं होतं. एवढंच नाही तर त्याला खूप दागिने घातले. तसेच त्याच्या डोक्यावर पदर ठेवला, डोळ्यांना काजळही लावलं. एवढा शृंगार झाल्यानंतर नववधूप्रमाणे लाजणाऱ्या रामदेव याचे खूप फोटोही काढले. त्यानंतर शिवलाल मेघवाल आणि कविता या जोडप्याने बजरंग आणि रामदेव या मुलांसह पाण्याच्या टाकीत उडी मारली. त्यांचे मृतदेह घराजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये तरंगताना दिसून आले.
याबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक मानाराम गर्ग यांनी सांगितले की, या चौघांचे मृतदेह हे मंगळवारी संध्याकाळी पाण्याच्या टाकीत सापडले. मृत कविता हिच्या नातेवाईकांना माहिती दिल्यानंतर बुधवारी सकाळी त्यांच्या उपस्थितीत मृतहेद बाहेर काढण्यात आले.
दरम्यान, मृत कविता हिचे काका गोपीलाल यांनी सांगितले की, शिवलाल हे प्रधानमंत्री आवाज योजनेंतर्गत मिळालेल्या पैशांमधून वेगळं घर बांधू इश्चित होते. मात्र त्यांचा भाऊ आणि आईचा त्यांना विरोध होता. या कौटुंबिक तणावामुळे ते त्रस्त होते. तसेच त्यांनी २९ जून रोजीसुद्धा जीवन संपवण्याच्या इराद्यान एक चिठ्ठी लिहिली होती. मात्र त्यावेळी त्यांनी तो निर्णय टाळला होता. मात्र अखेरीस त्यांनी जीवन संपवले. दरम्यान, आता पोलीस शिवलाल आणि कविता यांच्या नातेवाईकांची चौकशी करून पुढील तपास करत आहेत.