भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक आली समोर; जपानच्या तंत्रज्ञानाने सज्ज; काय आहेत वैशिष्ट्ये?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 17:46 IST2026-05-18T17:43:50+5:302026-05-18T17:46:51+5:30
रेल्वे मंत्रालयाने भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचा फोटो प्रसिद्ध केला आहे.

भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक आली समोर; जपानच्या तंत्रज्ञानाने सज्ज; काय आहेत वैशिष्ट्ये?
Mumbai-Ahmedabad Bullet Train: भारतातील पहिल्या हाय-स्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या ट्रेनची झलक रेल्वे मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली आहेत. मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडोरवर धावणाऱ्या या ट्रेनचे डिझाइन पूर्णपणे एयरोडायनामिकवर आधारित आहे. रेल्वे मंत्रालयाच्या मते, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन १५ ऑगस्ट २०२७ रोजी करण्याचे उद्दिष्ट आहे. ही ट्रेन सुरू झाल्यानंतर मुंबई ते अहमदाबाद हे अंतर अवघ्या दोन तासांवर येणार आहे.
भारताची बुलेट ट्रेन जपानच्या ज्या मॉडेलवर तयार झाली आहे त्या ट्रेनला तिथल्या भाषेत हायबुसा म्हटले जाते. ही जपानमधील सर्वात आधुनिक हाय-स्पीड ट्रेन आहे. या ट्रेनचा पुढचा भाग एखाद्या पक्ष्याच्या चोचीसारखा किंवा लांब नाकासारखा दिसतो. हा स्टाईलचा भाग नसून त्यामागे विज्ञान आहे. जेव्हा ट्रेन ३२० किमी प्रतितास या वेगाने बोगद्यात शिरते, तेव्हा हवेचा प्रचंड दाब निर्माण होतो. या लांब नाकामुळे हवेचा रोध कमी होतो आणि बोगद्यातून बाहेर पडताना होणारा तीव्र आवाज रोखला जातो.
ही ट्रेन ३०० ते ३२० किलोमीटर प्रतितास या वेगाने धावते, पण आत बसलेल्या प्रवाशांना साधा झटकाही जाणवत नाही. यामध्ये अत्यंत प्रगत सस्पेंशन सिस्टम आणि लिनियर मोटर टेक्नॉलॉजी वापरली आहे. याच्या अल्ट्रा-स्मूथ ट्रॅक डिझाईनमुळे प्रवाशांना विमानात बसल्यासारखा लक्झरी अनुभव मिळतो.
A picture of the country's first proposed bullet train has been displayed at the Ministry of Railways. The picture has been installed at Gate Number 4: Indian Railways pic.twitter.com/LcbwMstDuw
— ANI (@ANI) May 18, 2026
भूकंप येण्यापूर्वीच थांबते ट्रेन
जपान हा भूकंपाचा देश असल्याने या ट्रेनची सुरक्षा यंत्रणा तशीच तयार केली गेली आहे. ट्रेनमध्ये बसवलेले सेन्सर्स भूकंपाचे सूक्ष्म धक्केही लगेच ओळखतात. धक्का जाणवताच ऑटोमॅटिक ब्रेकिंग सिस्टम सुरु होते आणि अवघ्या काही सेकंदांत ट्रेन थांबते.
भारत आणि जपानचे कनेक्शन काय?
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडोर हा पूर्णपणे भारत आणि जपान यांच्या सहकार्याने विकसित केला जात आहे. म्हणजेच या ट्रेनचे तंत्रज्ञान, सुरक्षा प्रणाली आणि डिझाइन फिलॉसॉफी पूर्णपणे जपानी आहे. त्यामुळेच समोर आलेली पहिली भारतीय बुलेट ट्रेन जपानच्या E5 Shinkansen सारखीच दिसत आहे.
काय बदलणार?
जपानचे तंत्रज्ञान वापरले जात असले तरी भारताचे हवामान, येथील गर्दी, ट्रॅकची रचना आणि ऑपरेशनल पद्धती लक्षात घेता या मॉडेलमध्ये काही महत्त्वपूर्ण भारतीय बदल केले जातील.
पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम
ही बुलेट ट्रेन पूर्णपणे इलेक्ट्रिक असेल. यामध्ये हाय-इफिशियन्सी मोटर्सचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे प्रति प्रवासी ऊर्जेचा वापर अत्यंत कमी होतो.
प्रकल्पाची सद्यस्थिती
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या गुजरात आणि महाराष्ट्रात या प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक ठिकाणी ट्रॅक टाकणे, पिलर्स उभारणे आणि अत्याधुनिक स्टेशन्सच्या बांधकामाने गती घेतली आहे.