प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 15:02 IST2025-08-16T15:01:52+5:302025-08-16T15:02:23+5:30
Chhattisgarh News: छत्तीसगडमधून एक अजब घटना समोर आली आहे. छत्तीसगडमधील विलासपूर उच्च न्यायालयाने एका पतीची हरवलेली पत्नी २८ ऑगस्टपर्यंत शोधून आणण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?
छत्तीसगडमधून एक अजब घटना समोर आली आहे. छत्तीसगडमधील विलासपूर उच्च न्यायालयाने एका पतीची हरवलेली पत्नी २८ ऑगस्टपर्यंत शोधून आणण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. एका तरुणाने या संदर्भात कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. त्या याचिकेतील उल्लेखानुसार, सदर तरुणाने त्याच्या प्रेयसीसोबत आर्य समाजामध्ये प्रेमविवाह केला होता. दोघेही पती पत्नीप्रमाणे राहत होते. मात्र काही दिवसांतच त्याच्या पत्नीचे नातेवाईक तिला घेऊन गेले होते. तेव्हापासून त्याची पत्नी बेपत्ता आहे. तचेस नातेवाईकही तिच्याबाबत माहिती देत नव्हते. त्यामुळे हतबल झालेल्या सदर तरुणाने कोर्टात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी करताना कोर्टाने हा निकाल दिला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार छत्तीसगडमधील विलासपूर आणि मुंगेरी येथील हा प्रकार आहे. विलासपूर येथील सूरज बंजारे आणि मुंगेली येथील एका तरुणीमध्ये मैत्री होती. त्यांची ही मैत्री प्रेमामध्ये बदलली. त्यानंतर या दोघांनीही रायपूर येथील आर्य समाज मंदिरात रीतीरिवाजानुसार लग्न केले. तसेच या विवाहाची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनाही होती. दोघेही पती-पत्नि म्हणून राहू लागले. मात्र काही दिवसांनी सदर तरुणीचे नातेवाईक तिला भेटण्यासाठी आले आणि तिला जबरदस्तीने घेऊन गेले. तेव्हापासून तिची काहीच खबर नाही आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या पत्नीने पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे सूरजने कोर्टात धाव घेत न्यायासाठी धाव घेतली.
या तरुणाने सांगितले की, माझी पत्नी काही दिवसांनी घरी परतणार होती. मात्र बरेच दिवस ती घरी न परतल्याने मी तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. मात्र ते कुठलीही माहिती देत नव्हते. अशा परिस्थिती मी पोलिसांकडे थाव घेतली. मात्र तिथेही निराशाच हाती लागली. तेव्हा मी उच्च न्यायालयात धाव घेत बंदी प्रत्यक्षीकरण याचिका दाखल केली. माझी पत्नी माझ्या घरी येऊ इच्छित आहे. मात्र तिचे नातेवाईक तिला येऊ देत नाही आहेत. तिचं काही बरंवाईट होईल, अशी मला भीती आहे, असे त्याने कोर्टात सांगितले. त्यानंतर कोर्टाने वरील निर्णय दिला आहे.
बिलासपूर हायकोर्टाने या प्रकरणाची सुनावणी करताना हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगितले तसेच कोर्टाने या प्रकरणी तपास करून २८ ऑगस्टपर्यंत सदर तरुणीला शोधून काढण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे. तसेच या तरुणीच्या वडिलांनाही कोर्टात हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.