बापानं किडनी देऊन वाचवलं, कर्जाचा डोंगर उपसून उपचार केले; पण त्याच मुलानं आयुष्य संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 11:45 IST2026-01-09T11:44:19+5:302026-01-09T11:45:15+5:30
ज्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी बापाने स्वतःची किडनी दिली, उपचारांसाठी लाखो रुपयांचे कर्ज काढले, त्याच मुलाने हॉस्पिटलच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

AI Generated Image
नियती कधी कोणता डाव खेळेल याचा नेम नसतो, याचाच प्रत्यय देणारी एक अतिशय दुःखद घटना राजस्थानच्या जयपूरमध्ये घडली आहे. ज्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी बापाने स्वतःची किडनी दिली, उपचारांसाठी लाखो रुपयांचे कर्ज काढले, त्याच मुलाने हॉस्पिटलच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. हंसराज जाट असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, त्याच्या मृत्यूच्या बातमीने टोंक जिल्ह्यातील ठोरिया पचेवर गावावर शोककळा पसरली आहे.
बापाची धडपड ठरली अपयशी
मृत हंसराज हा गेल्या काही काळापासून किडनीच्या आजाराने त्रस्त होता. मुलाचा जीव वाचवण्यासाठी त्याचे वडील गोगाराम यांनी सर्वस्व पणाला लावले होते. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी, सप्टेंबरमध्ये गोगाराम यांनी स्वतःची किडनी देऊन हंसराजला नवे आयुष्य दिले होते. मुलाच्या उपचारांसाठी कुटुंबाने मोठे कर्जही घेतले होते. हंसराज बरा होऊन पुन्हा संसाराचा गाडा हाकेल, अशी आशा बापाला होती, मात्र मुलाच्या मनात काहीतरी वेगळेच शिजत होते.
पाच मिनिटांची डुलकी अनर्थ ओढवून गेली...
हंसराज जयपूरच्या एसएमएस हॉस्पिटलमधील सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये उपचार घेत होता. गुरुवारी सकाळी वडिलांनी त्याला चहा दिला. मुलाची सेवा करून थकलेले वडील बाजूलाच बसले असताना त्यांची काही वेळ डोळा लागला. नेमकी हीच संधी साधून हंसराजने बेडवरून उठून सहाव्या मजल्यावरील खिडकी गाठली आणि ७० फूट उंचीवरून खाली उडी मारली. मोठा आवाज झाल्यावर वडिलांना जाग आली, पण तोपर्यंत सर्व संपले होते.
बाप शुद्ध हरपून पडला!
मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच गोगाराम यांनी हंबरडा फोडला आणि ते शुद्ध हरपून खाली पडले. "मी त्याला माझ्या रक्ताचं पाणी करून वाचवलं होतं, स्वतःची किडनी दिली होती, पण देवाला हे मान्य नव्हतं," असे म्हणत गोगाराम रडत होते. कर्जाच्या बोजापेक्षाही पोटच्या मुलाला गमावल्याचे दुःख त्यांच्या डोळ्यातून वाहत होते.
दोन लहान मुलांच्या डोक्यावरचं छत्र हरपलं
हंसराज एका खासगी कंपनीत कामाला होता. त्याच्या पश्चात पत्नी, एक ७ वर्षांची मुलगी आणि ३ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्याच खांद्यावर होती. आजारपणामुळे तो मानसिक तणावाखाली होता, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र, तो बाहेरून कोणालाही काही जाणवू देत नव्हता. अखेर या तणावातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.