प्रसिद्ध यू ट्यूबरचा घरात आढळला मृतदेह; वडिलांच्या दाव्याने मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 01:52 PM2023-11-24T13:52:58+5:302023-11-24T13:54:41+5:30

ग्रामीण शैली आणि साध्यासोप्या भाषेत व्हिडिओ बनवणारी मालती चौहान ही अल्पावधीतच सोशल मीडियावर लोकप्रिय झाली होती.

Famous YouTuber woman dies body found hanging in house | प्रसिद्ध यू ट्यूबरचा घरात आढळला मृतदेह; वडिलांच्या दाव्याने मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण

प्रसिद्ध यू ट्यूबरचा घरात आढळला मृतदेह; वडिलांच्या दाव्याने मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण

लखनौ - यू ट्यूब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या ३० वर्षीय महिलेचा घरात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मालती चौहान असं मृत महिलेचं नाव आहे. मालतीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने तिने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र याप्रकरणी मालतीचे वडील दीपचंद यांनी तिचा पती विष्णू चौहान याच्यावर गंभीर आरोप केल्याने मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालती चौहान ही रात्री जेवण करून आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेली. मात्र सकाळी बराच वेळ झाला तरी ती बाहेर आली नाही. त्यामुळे तिच्या सासूने आवाज देत तिला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र मालतीने कोणताही प्रतिसाद न दिल्याने दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करण्यात आला. तेव्हा मालतीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

काय आहे वडिलांचा आरोप?

मालतीचे वडील दीपचंद यांच्या म्हणण्यानुसार, तिचा पती विष्णू चौहान या हुंडा मागत तिचा सतत छळ करत होता. तसंच विष्णूचे अन्य एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंधही होते. त्यामुळे दोघांमध्ये सतत भांडण होत असे. यातून विष्णूनेच तिचा खून केल्याचा संशय आहे, असं दीपचंद यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मालतीने आत्महत्या केली की तिचा खून करण्यात आला, याचा उलगडा करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.

दरम्यान, आपल्या ग्रामीण भाषेत व्हिडिओ बनवणारी मालती चौहान अल्पावधीतच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली होती. यू ट्यूबवर तिच्या चॅनलचे ६ लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स होते. मात्र मालतीच्या अचानक झालेल्या मृत्यूने तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

Web Title: Famous YouTuber woman dies body found hanging in house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.