पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 15:16 IST2025-05-17T14:53:12+5:302025-05-17T15:16:40+5:30
Crime News: देशविरोधी कारवाया आणि पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिला गुप्तचर यंत्रणांकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात ज्योतीसह एकूण सहा जणांना अटक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय सैन्यदलांनी राबवलेलं ऑपरेशन सिंदूर यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव मागच्या काही काळापासून कमालीचा वाढलेला आहे. अशा परिस्थितीत देशविरोधी कारवाया आणि पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिला गुप्तचर यंत्रणांकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात ज्योतीसह एकूण सहा जणांना अटक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
प्रसिद्ध ट्रॅव्हल ब्लॉगर असलेल्या ज्योती मल्होत्रा हिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. ज्योती ‘ट्रॅव्हल विथ ज्यो’ नावाचा युट्युब चॅनेल चालवते. ती पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेली असताना ती पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयच्या संपर्कात आली. या प्रकरणात आतापर्यंत पंजाब आणि हरयाणाच्या विविध भागात राहणाऱ्या एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार ज्योती मल्होत्रा हिने पाकिस्तानच्या उच्चायोगाकडून व्हिसा प्राप्त करून २०२३ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. या दरम्यान, तिची भेट पाकिस्तानच्या उच्चायोगातील कर्मचारी एसहास-उर-रहीम उर्फ दानिश याच्याशी झाली. त्यानंतर त्यांच्यातील संबंध अधिकच घनिष्ट होत गेले. दानिशच्या माध्यमातून ज्योती हिची ओळख पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांमधील इतर एजंट्ससोबत झाली. ज्यामध्ये अली अहसान आणि शाकिर ऊर्फ राणा शहबाज यांचाही समावेश होता.
ज्योती या एजंट्ससोबत व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट यासारथ्या एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून संपर्कात राहायची. ती पाकिस्तानबाबत सोशल मीडियावरून सकारात्मक माहिती शेअर करायची, सोबतच तिने काही संवेदनशील माहितीसुद्धा पाकिस्तानी एजंट्सना दिली.
एवढंच नाही तर ज्योती एका पाकिस्तानी गुप्तचर एजंट्सच्या प्रेमातपडली होती. तसेच त्याच्यासोबत हल्लीच इंडोनेशियातील बाली येथे जाऊन आली होती. ज्योती मल्होत्रा हिच्या सोशल मीडियावर असलेल्या प्रभावाचा वापर पाकिस्तान भारतविरोधी प्रचार आणि गुप्तचर कारवायांसाठी करत होता, हेही आता समोर आले आहे.