पाकच्या अपप्रचाराचे मनसुबे जुबेरने उधळले, १५० ट्वीट करीत चुकीची माहिती आणली उजेडात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 12:39 IST2025-05-09T12:37:45+5:302025-05-09T12:39:26+5:30
भारतात तणावाचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले

पाकच्या अपप्रचाराचे मनसुबे जुबेरने उधळले, १५० ट्वीट करीत चुकीची माहिती आणली उजेडात
असिफ कुरणे
कोल्हापूर : भारतीय सैन्य ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करीत होते तेव्हा सोशल मीडियावरपाकिस्तानी युजरकडून राबविण्यात येणाऱ्या फेक न्यूज, प्रॉपगेंडा (प्रचार) उधळून लावण्याचे काम ‘अल्ट न्यूज’च्या मोहम्मद जुबेर या फॅक्ट चेकरने केले. जुबेरने त्या रात्री तब्बल १५० ट्वीट करत चुकीची माहिती उघडी पाडली. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतात तणावाचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले.
मोहम्मद जुबेर सोशल मीडियावरील चुकीची माहिती, फेक न्यूज शोधून त्याचे फॅक्ट चेक करण्याचे काम करतात. प्रतीक सिन्हा, मोहम्मद जुबेर व त्यांची ‘अल्ट न्यूज’ ही फॅक्ट चेकिंग संस्था आहे. देशभरातील विविध प्रकारच्या चुकीच्या माहितीविषयी तथ्य शोधून खरी माहिती लोकांसमोर आणण्याचे काम त्यांची टीम करते. त्यांच्या कामगिरीमुळे अनेक राज्यांत धार्मिक तणाव निवळण्यात मदत झाली आहे.
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले त्यावेळी पाकिस्तानकडून सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवून खोटा प्रचार पसरविण्याचे काम सुरू झाले. भारतीय सैन्य अधिकारी, राजकीय पक्षाचे समर्थक, पत्रकार अशी खोटी अकाउंट बनविण्यात आली होती. जुबेर यांनी त्या रात्री अशी फेक अकाउंट उघड केली. त्यातून पाकिस्तानचा अजेंडा उघडा पडला व भारतात होणारी संभाव्य तणावाची परिस्थिती टळली.
नेटिझन्स झाले सावध
जुबेर यांनी पाकिस्तानचे प्रत्येक ट्वीट खोटे ठरवत अपप्रचाराची हवाच काढून घेतली. जुबेर सांगतात की, ६ आणि ७ मे दरम्यानच्या रात्री जवळपास १५० पेक्षा जास्त ट्वीट करीत पाकिस्तानी प्रचार धुळीस मिळवला. भारतीय नावाने पाकिस्तानी अजेंडा चालविणाऱ्या खोट्या नावांची यादी टाकत जुबेर यांनी भारतीय नेटिझन्सना वेळीच सावध केले. त्यांच्या या कामाची प्रमुख माध्यमांनी दखल घेत आपल्या बातम्यांमध्येदेखील योग्य ते बदल केले.