"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 16:44 IST2025-12-28T16:44:03+5:302025-12-28T16:44:34+5:30
Mallikarjun Kharge, Congress vs BJP: "काँग्रेसने धर्माला श्रद्धेपुरते मर्यादित ठेवलं, राजकारणासाठी वापर केला नाही"

"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Mallikarjun Kharge, Congress vs BJP: काँग्रेस संपली म्हणणाऱ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की, आमची शक्ती कमी झाली असेल किंवा आमच्या सत्ता नसेल, पण आमचा कणा अजूनही ताठ आहे, अशा शब्दांत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसच्या १४० व्या स्थापना दिनानिमित्तच्या भाषणात भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. दिल्लीतील कार्यक्रमात बोलताना खरगे म्हणाले की, काँग्रेसने कधीही सत्तेसाठी सौदेबाजी केली नाही. तसेच संविधान, धर्मनिरपेक्षता किंवा गरिबांच्या हक्कांशी तडजोड केली नाही.
नेमके काय म्हणाले खरगे?
"काँग्रेसमुक्त भारत करण्याची स्वप्न काही लोक पाहत आहेत. काँग्रेस संपली आहे असे म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की, आमच्याकडे सामर्थ्य, बळ किंवा सत्ता काही प्रमाणात कमी असू शकते, पण आमचा पाठीचा कणा अजूनही ताठ आहे. आम्ही सत्तेसाठी कुणापुढे झुकलेलो नाही. आम्ही सत्तेत नसलो तरी आम्ही सौदेबाजी करणार नाही. काँग्रेसने कधीही धर्माच्या नावाखाली मते मागितली नाहीत. मंदिरे आणि मशिदींच्या नावाखाली द्वेष पसरवला नाही," असे खरगे यांनी ठणकावून सांगितले.
"काँग्रेस जोडण्याचे काम करते"
भाजपवर निशाणा साधताना खरगे म्हणाले, "काँग्रेस नेहमी जोडण्याचे आणि एकत्र येण्याचे काम करते, तर भाजप तोडण्याचे आणि फोडाफोडीचे राजकारण करते. काँग्रेसने नेहमीच धर्माला श्रद्धेपुरते मर्यादित ठेवले आहे, परंतु काही लोकांनी त्याचा वापर राजकारणातील शस्त्र म्हणून केला आहे. आज भाजपकडे सत्ता आहे, पण सत्य नाही. म्हणूनच कधी डेटा लपवला जातो, कधी जनगणना थांबवली जाते, तर कधी संविधान बदलण्याची चर्चा होते."
"गेल्या ११ वर्षात मोदी सरकारने काँग्रेसने उभारी दिलेल्या संस्था कमकुवत केल्या. भाजपच्या राज्यात राष्ट्रीय संपत्तीसोबतच पाणी, जंगले आणि जमीनही धोक्यात आहे. अनेक आरएसएस आणि भाजप नेत्यांनी संविधान, तिरंगा ध्वज, अशोक चक्र आणि वंदे मातरम देखील स्वीकारलेले नाहीत. आरएसएस-भाजप नेत्यांनी नेहमीच समाजाच्या प्रगतीसाठी बनवलेल्या कायद्यांना विरोध केला आहे आणि लोकांचे हक्क दडपण्याचे काम केले आहे," असा घणाघाती आरोप खरगे यांनी केला.