कारमधून २ कोटी रुपयांची रोकड घेऊन फरार झालेल्या आरोपीचा एन्काऊंटर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 00:08 IST2025-10-06T00:08:05+5:302025-10-06T00:08:21+5:30
Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील फिरोजाबाद येथे पोलिसांच्या कोठडीतून फरार झालेला दोन कोटी रुपयांच्या लुटीमधील आरोपी चकमकीत ठार झाला आहे. नरेश खैर असं या आरोपीचं नाव असून, त्याने सहा दिवसांपूर्वी गुजरातमधील एका कारमधून २ कोटी रुपयांची रोख रक्कम लांबवली होती.

कारमधून २ कोटी रुपयांची रोकड घेऊन फरार झालेल्या आरोपीचा एन्काऊंटर
उत्तर प्रदेशमधील फिरोजाबाद येथे पोलिसांच्या कोठडीतून फरार झालेला दोन कोटी रुपयांच्या लुटीमधील आरोपी चकमकीत ठार झाला आहे. नरेश खैर असं या आरोपीचं नाव असून, त्याने सहा दिवसांपूर्वी गुजरातमधील एका कारमधून २ कोटी रुपयांची रोख रक्कम लांबवली होती. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी नरेश याला अटक केली होती. मात्र तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला होता.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार पोलिसांनी आरोपी नरेश याला रविवारी अटक केली होती. मात्र हायवे क्रमांक २ वरील मक्खनपूर पोलीस ठाण्याच्या परिसरातून शौचाला जाण्याचा बहाणा करून तो पसार झाला होता. त्यानंतर पोलिसांचा त्याचा शोध घेण्यासाठी चार पथके तयार केली होती. तसेच पोलिसांकडून तपासणी अभियानही सुरू करण्यात आले होते. अखेरीस संध्याकाळी बीएमआर हॉटेलच्या मागे पोलिस आणि आरोपी नरेश यांच्यात चकमक झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नरेश याने आधीपासूनच या परिसरात हत्यार लपवून ठेवलेलं होतं. चकमकीदरम्यान त्याने पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर प्रत्युत्तरदाखल करण्यात आलेल्या कारवाईमध्ये तो जखमी झाला. तसेच नंतर त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्याच्याकडून ४० लाख रुपये रोख, दोन पिस्तूल आणि काडतुसे जप्त केली आहेत.