Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 15:16 IST2025-11-15T15:13:31+5:302025-11-15T15:16:44+5:30
उत्तरेतील राज्यात भाजपची कामगिरी चांगली राहिली आहे. पण, खरं आव्हान पुढच्या वर्षी असणार आहे. भाजपचे दक्षिणेतील तीन राज्यात सत्ता मिळवण्याचं स्वप्न आहे.

Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
हरयाणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि बिहार... लागोपाठ चार राज्यांमध्ये भाजपने सत्ता मिळवली. बिहारमध्ये भाजपला मागील निवडणुकीप्रमाणेच मोठं यश मिळालं आहे. आता भाजपचे लक्ष्य २०२६ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर असून, चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशापैकी दोन ठिकाणी भाजपची सत्ता आहे. मात्र, तीन राज्यात भाजपचे सत्तेचे अजूनही अपूर्ण आहे.
पुढील वर्षी म्हणजे २०२६ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका एनडीए राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी महत्त्वाच्या आहेत.
तामिळनाडू विधानसभा
दक्षिणेतील एक महत्त्वाचे राज्य असलेल्या तामिळनाडूमध्ये प्रादेशिक पक्षामध्येच सत्तेसाठी चुरस असते. द्रमुक पक्षाची काँग्रेस, डावे पक्ष आणि इतर छोट्या पक्षांसोबत आघाडी आहे. अण्णा द्रमुकने भाजपसोबत युती केली आहे. तामिळनाडूमध्ये ताकद वाढवण्याचे प्रयत्न भाजपकडून सातत्याने होत आहे, पण त्यात अजूनही यश आले आहे.
अण्णा द्रमुकसोबत युतीमध्ये सत्ता मिळाल्यास भाजपला तामिळनाडूमध्ये पक्ष संघटन मजबूत करता येणार आहे. त्यामुळेच भाजपला तामिळनाडूमध्ये सत्ता मिळवणे महत्त्वाचे आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा
भाजप गेल्या काही वर्षांपासून जे राज्य मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, ते आहे पश्चिम बंगाल! बिहार विधानसभेचा निकाल लागताच भाजपच्या नेत्यांनी पुढे लक्ष्य पश्चिम बंगाल म्हणण्यास सुरूवात केली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे राज्य आहे.
ममता बॅनर्जी यांना पराभूत करण्यासाठी भाजपकडून गेल्या काही वर्षांपासून व्यूहरचना केली जात आहे. भाजपने पश्चिम बंगालमध्येही जंगलराजचा उल्लेख करणे सुरू केले आहे. तीन दशके सत्तेत राहिलेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस आता राज्यात फार प्रभावी राहिलेले नाही. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस पार्टी अशीच लढत बघायला मिळणार आहे.
केरळ विधानसभा
दक्षिणेतील असे राज्य जिथे भाजप आपली मूळ रोवण्याचे प्रयत्न करत आहे. पण, पक्षाला अद्यापही अपेक्षित यश मिळालेलं नाही. केरळमध्येही प्रत्येक पाच वर्षांनी सत्तांतर होते. पण, गेल्यावेळी हा परंपरा खंडित झाली. डाव्या पक्षाच्या आघाडीला दुसऱ्यांदा सत्ता मिळवण्यात यश आले.
केरळ राज्य भाजपबरोबर काँग्रेससाठीही महत्त्वाचे आहे. डावे पक्ष आणि काँग्रेस यांच्यात सत्तेसाठी तीव्र स्पर्धा होण्याचीच जास्त शक्यता आहे. पण, भाजपलाही केरळमध्ये चांगली कामगिरीची अपेक्षा आहे.
आसाम विधानसभा
मागील दहा वर्षांपासून आसामध्ये भाजपची सत्ता आहे. तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांच्याकडून सातत्याने धुव्रीकरणावर भर दिला जात असल्याचे दिसत आहे. काँग्रेसही आसामच्या सत्तेसाठी प्रयत्नशील आहे. पण, काँग्रेससाठी ही लढाई सोपी नाही.
पुद्दुचेरी विधानसभा
केंद्र शासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीमध्ये ऑल इंडिया एन.आर. काँग्रेसचे नेते एन. रंगास्वामी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार आहे. गेल्या निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले होते. भाजपचे सहा आमदार आहेत. ३० आमदार असलेल्या विधानसभेसाठी एनडीए रंगास्वामींच्या नेतृत्वाखालीच सामोरी जाणार आहे.