मतदारयाद्या पुनरिक्षणाच्या अंतिम मुदतीत एका आठवड्याने वाढ : निवडणूक आयोग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 09:19 IST2025-12-01T09:18:05+5:302025-12-01T09:19:12+5:30
आयोगानुसार, मतमोजणी अर्ज वितरण व दाखल करण्यासाठीची मुदत आता ४ ऐवजी ११ डिसेंबर असेल.

मतदारयाद्या पुनरिक्षणाच्या अंतिम मुदतीत एका आठवड्याने वाढ : निवडणूक आयोग
नवी दिल्ली: नऊ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) प्रक्रियेसंबंधी कार्यक्रमाची मुदत निवडणूक आयोगाने एक आठवड्याने वाढविली आहे. अपुऱ्या मुदतीमुळे लोकांसह निवडणूक अधिकाऱ्यांनाही समस्या निर्माण होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. आयोगानुसार, मतमोजणी अर्ज वितरण व दाखल करण्यासाठीची मुदत आता ४ ऐवजी ११ डिसेंबर असेल.
विरोधी पक्षांनी केला होता हा आरोप
विरोधी पक्षांनी मतदारयाद्या पुनरिक्षणासाठी देण्यात आलेल्या मुदतीबाबत आक्षेप घेत या प्रक्रियेतील यंत्रणेवर आरोप केले होते. एसआयआर दरम्यान किमान ४० बूथ-स्तरीय
अधिकाऱ्यांचा (बीएलओ) मृत्यू झाला असल्याचा दावा विरोधी पक्षांनी केला होता. प्रक्रियेसाठी असलेल्या अत्यंत कमी मुदतीमुळे काही अधिकाऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आरोपही करण्यात आला होता.
राजस्थानात मृत्यू, ताणाचा परिणाम बीएलओचा
जयपूर : मतदारयाद्या पुनरीक्षणाच्या प्रक्रियेदरम्यान राजस्थानातील धोलपूरमध्ये एका ४२ वर्षीय बूथस्तरीय अधिकाऱ्याचा (बीएलओ) मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, अनुज गर्ग शनिवारी रात्री उशिरा मतदारांचा डेटा अपलोड करीत असताना बेशुद्ध पडले.
प्रचंड दबावामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. प्रताप विहार कॉलनीत घरी मतदारांचा डेटा अपलोड करीत असताना गर्ग यांनी चहा मागितला आणि काही मिनिटांतच ते कोसळले. हे काम सुरू झाल्यापासून गर्ग रोज रात्रीपर्यंत घरी हे काम करीत होते.