EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 18:20 IST2025-10-20T18:16:26+5:302025-10-20T18:20:13+5:30
Fake Indian Passport: पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या बनावट पासपोर्ट रॅकेटचा तपास करत असलेल्या ईडीने आता या रॅकेटच्या माध्यमातून बनावट भारती पासपोर्ट मिळवणाऱ्या सात पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू केला आहे. या पासपोर्टची व्यवस्था या रॅकेटमधील इंदू भूषण हलदर याने केली होती. त्याला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली आहे.

EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या बनावट पासपोर्ट रॅकेटचा तपास करत असलेल्या ईडीने आता या रॅकेटच्या माध्यमातून बनावट भारतीपासपोर्ट मिळवणाऱ्या सात पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू केला आहे. या पासपोर्टची व्यवस्था या रॅकेटमधील इंदू भूषण हलदर याने केली होती. त्याला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार इंदू भूषण हलदर याची पाकिस्तानी नागरित आझाद मलिक याच्याशी भेट झाली होती. तो हे सात संशयित पाकिस्तानी नागरिक आणि इंदू भूषण हलदर यांच्यामध्ये मध्यस्थाची भूमिका बजावत होता. या आझाद मलिक याला या वर्षाच्या सुरुवातीला या रॅकेट प्रकरणी अटक करण्यात आली होती.
अधिकाऱ्यांच्या मते सातही संशयितांनी भारतीय ओळख मिळवण्यासाठी आझाद मलिक याने निवडलेला मार्ग अवलंबला असावा अशी शक्यता वर्तवली आहे. मूळचा पाकिस्तानी असलेल्या आझाद महिक याने आधी बनावट बांगलादेशी ओखळपत्र तयार केले. त्यानंतर तो स्वत: बांगलादेशी असल्याचे सांगू लागला. त्यानंतर त्याने बनावट भारतीय कागदपत्रे तयार करून भारतीय पासपोर्ट मिळवला. त्यानंतर कोलकाता येथे भाडेकरू म्हणून राहत हवाला व्यवसाय आणि बनावट पासपोर्टचं रॅकेट चालवण्यास सुरुवात केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी ईडीने आतापर्यंत २५० हून अधिक पासपोर्ट गोळा केले आहेत. त्यामध्ये सात पाकिस्तानी पासपोर्टचाही समावेश आहे. इंदू भूषण हलदर याने यापैकी बहुतांश पासपोर्ट हे मलिक याच्या शिफारशीवरूनच तयार केले होते, अशी माहिती चौकशीमधून समोर आली आहे. एवढंच नाही तर मलिक याने पाठवलेल्या ग्राहकांसाठी बनावट पासपोर्ट तयार करून हलदर याने सुमारे २ कोटी रुपयांची कमाई केल्याची बाब समोर आली आहे.
दरम्यान, इंदू भूषण हलदर याला नादिया जिल्ह्यामधील चकदाहा येथून अटक करण्यात आली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तर मलिक याला एप्रिल महिन्यात अटक करण्यात आली होती. हे संपूर्ण बनावट पासपोर्ट रॅकेट गतवर्षी पश्चिम बंगाल पोलिसांनी केलेल्या कारवाईमधून उघडकीस आले होते. त्यानंतर या प्रकरणी ईडीने तपासाला सुरुवात केली होती.