पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी केलेल्या ऑपरेशन सिंदूरला आता तीन महिने लोटत आहेत. या तीन महिन्यांमध्ये ऑपरेशन सिंदूरबाबत वेगवेगळे दावे आणि अनेक आरोप प्रत्यारोप झाले आहेत. दरम्यान, भारताचे हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारतीय हवाई दलाच्या एअर डिफेन्स सरफेस टू एअर मिसाईल सिस्टिमने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने आणि एक अवाक्स विमान पाडले, अशी माहिती हवाईदलप्रमुख ए.पी. सिंह यांनी बंगळुरूमध्ये आयोजित एअरचीफ मार्शल एल.एम. कात्रे व्याख्यानमालेदरम्यान दिली.
भारताच्या एस-४०० एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानच्या या विमानांना पाडले. त्यामध्ये एईडब्ल्यू अँड सी विमानाला तब्बल ३०० किलोमीटर अंतरावरून लक्ष्य करण्यात आले, अशी माहिती हवाई दलप्रमुखांनी दिली. ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानला झालेल्या नुकसानाबाबत भारतीय हवाई दलाने पहिल्यांदाच अधिकृतरीत्या माहिती देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
हवाई दलप्रमुख सिंह पुढे म्हणाले की, पहलगाम एस ४०० एअर डिफेन्स सिस्टिम हल्लीच हवाई दलाच्या ताफ्यामध्ये दाखल झाले आहे. तसेच या संपूर्ण कारवाईदरम्यान, ते गेमचेंजर ठरले. या एअर डिफेन्स सिस्टिममुळे पाकिस्तानी विमानांना भारताच्या हद्दीत प्रवेश करणे आणि लांब पल्ल्याचे ग्लाईड बॉम्ब फेकणे शक्य झाले नाही, असेही हवाईदलप्रमुखांनी सांगितले.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेल्या कारवाईबाबतही हवाईदलांनी पुरावे सादर केले. त्यांनी सांगितले की, या कारवाईसाठीचे सर्व लक्ष्य आधीच निश्चित करण्यात आले होते. तसेच संबंधित इमारतींची ओखळ पटवून त्यांना अचूक पद्धतीने लक्ष्य करण्यात आले. हल्ल्या आधीच्या आणि हल्ल्यानंतरच्या फोटोंमधून झालेल्या नुकसानाचा अंदाज बांधण्यात आला. इंटर सर्व्हिस कोऑर्डिनेशन आणि अत्याधुनिक हत्यार प्रणालीमुळे ही मोहीम यशस्वी ठरली तसेच शत्रूचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.