१६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली... तेजस क्रॅशमधील विंग कमांडरच्या मृत्यूने पत्नीला मोठा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 13:52 IST2025-11-23T13:48:26+5:302025-11-23T13:52:23+5:30
Namansh Syal : इंडियन एअर फ़ोर्सचे पायलट विंग कमांडर नमांश स्याल यांचा शुक्रवारी दुबई एअर शोमध्ये फ्लाइंग डेमोंस्ट्रेशन दरम्यान तेजस फायटर जेट क्रॅश झाल्याने मृत्यू झाला.

१६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली... तेजस क्रॅशमधील विंग कमांडरच्या मृत्यूने पत्नीला मोठा धक्का
इंडियन एअर फ़ोर्सचे पायलट विंग कमांडर नमांश स्याल यांचा शुक्रवारी दुबई एअर शोमध्ये फ्लाइंग डेमोंस्ट्रेशन दरम्यान तेजस फायटर जेट क्रॅश झाल्याने मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. नमांश यांच्या कुटुंबाचा अजूनही विश्वास बसत नाही की त्यांचा धाडसी मुलगा आता या जगात नाही. मूळचे हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील रहिवासी असलेल्या नमांश यांनी लव्ह मॅरेज केलं होतं.
नमांश यांची पत्नी देखील इंडियन एअर फ़ोर्स अधिकारी आहे. नमांश आणि अफसानाची यांनी अनेक स्वप्नं पाहिली होती होती. त्यांनी एकत्र देशाचं रक्षण करण्याची शपथ घेतली होती. पण तेजस फायटर जेट कोसळल्याने १६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली. अफसाना यांना पतीचा अभिमान आहे. पण आता नमांश कधीच सोबत नसणार ही भावनाच त्यांना असहय्य होत आहे. त्यांना सात वर्षांची मुलगी आहे. आपले वडील या जगात नाही याबाबत लेकीला माहिती देण्यात आलेली नाही.
विंग कमांडर नमांश स्याल हे त्यांची शिस्त आणि उत्कृष्ट सेवा रेकॉर्डसाठी ओळखले जात होते. त्यांनी हमीरपूर जिल्ह्यातील सुजानपूर तिराच्या सैनिकी शाळेत शिक्षण घेतलं. त्यांचे वडील जगन्नाथ हे निवृत्त लष्करी अधिकारी होते आणि नंतर ते हिमाचल प्रदेश शिक्षण विभागाचे प्रिन्सिपल झाले. नमांश स्याल यांचं पार्थिव रविवारी कोइम्बतूर येथील सुलूर एअर बेसवर आणण्यात आलं.
हृदयद्रावक! यूट्यूबवर एअर शोचा Video पाहत होते विंग कमांडरचे वडील, मिळाली लेकाच्या मृत्यूची माहिती
वडिलांना यूट्यूबवरून या दुःखद घटनेची माहिती मिळाली. हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील रहिवासी जगन्नाथ स्याल एअर शोशी संबंधित व्हिडीओ पाहत असताना अचानक त्यांना तेजस जेट क्रॅशची बातमी दिसली आणि काही क्षणातच त्यांचं हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त झालं. जगन्नाथ स्याल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते एक दिवस आधी त्यांच्या मुलाशी बोलले होते. नमांश यांनी त्यांना टीव्ही किंवा यूट्यूबवर त्याचा परफॉर्मन्स पाहण्यास सांगितलं होतं. दुपारी ४ वाजता व्हिडीओ पाहत असताना त्यांना क्रॅशची माहिती मिळाली.