Drying underwear in the open, FIR against social activist | उघड्यावर अंडरवेअर वाळत घातली म्हणून सामाजिक कार्यकर्त्याविरोधात दाखल केला गुन्हा 
उघड्यावर अंडरवेअर वाळत घातली म्हणून सामाजिक कार्यकर्त्याविरोधात दाखल केला गुन्हा 

मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) - चक्क उघड्यावर अंडरवेअर वाळत घातली म्हणून पोलिसांनी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडली असून, मुझफ्फरनगरमध्ये गेल्या २४ वर्षांपासून भ्रष्टाचार, भूखंडमाफिया यांच्याविरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते मास्टर विजय सिंह यांच्याविरोधात पोलिसांनी उघड्यावर अंडरवेअर वाळत घातल्याने गुन्हा दाखल केला आहे. मुझफ्फरनगरच्या डीएम सेल्जा कुमारी यांनी मास्टर विजय सिंह यांना धरण्यावरून उठवले होते. 

 डीएमनी केलेल्या कारवाईनंतर मास्टर विजय सिंह यांनी आपले धरणे आंदोलन शिव चौक येथे सुरू केले होते. दरम्यान, मास्टर विजय सिंह यांच्याविरोधात सिव्हिल लाइन ठाण्यात कलम ५०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे. संजय कुमार यांनी आंदोलनस्थळी अंडरवेअर वाळत घातल्याच्या आरोपाखाली विजय सिंह यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.  कलम ५०९ अंतर्गत स्त्रियांमध्ये लज्जा उत्पन्न करणारे वर्तन केल्याचा आरोपाखाली कारवाई होते.  

दरम्यान, विजय सिंह यांच्याविरोधात पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून घेत कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. यादरम्यान, मास्टर विजय सिंह यांनी आपण माघार घेणार नसल्याचे सांगितले. ''मी माघार घेणार नाही, शेवटपर्यंत संघर्ष करत राहीन, मग मला फाशी दिली तरी बेहत्तर,'' असे त्यांनी सांगितले. तसेच वाळत घातलेली अंडरवेअर आपली नव्हती तर ती तिथे राहणाऱ्या एका निराधार व्यक्तीची होती, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. 

दाखल करण्यात आलेला हा गुन्हा म्हणजे आपले आंदोलन संपवण्याचे कारस्थान असल्याचा आरोप विजय सिंह यांनी केला. विजय सिंह गेल्या २४ वर्षांपासून आंदोलन करत असून, भ्रष्टाचाराविरोधात दीर्घकाळ आंदोलन करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंद झाला आहे. 
 

Web Title: Drying underwear in the open, FIR against social activist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.