आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 16:57 IST2025-10-26T16:52:42+5:302025-10-26T16:57:33+5:30
आंध्र प्रदेशात जळून खाक झालेल्या बसच्या चालकाला अटक करण्यात आली आहे,या अपघातामध्ये २० जणांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला होता.

आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
आंध्र प्रदेशातील जळालेल्या बसच्या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये २० जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला होता. जर चालकाने पळून जाण्याऐवजी तिथेच थांबून लोकांना मदत केली असती तर एवढ्या प्रवाशांचा मृत्यू झाला नसता. चालकाचे नाव लक्ष्मय्या आहे. याला आज पोलिसांनी अटक केली.
तपासा दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. लक्ष्मय्या हा फक्त पाचवीपर्यंत शिकला आहे. त्याने जड वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी बनावट दहावीच्या प्रमाणपत्राचा वापर केला होता. परवाना नियमांनुसार, कोणतेही वाहतूक वाहन चालवण्यासाठी आठवीपर्यंत शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
२४ ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकुरु गावात एका स्लीपर बसखाली एक मोटारसायकल आली. बसने धडकण्यापूर्वी मोटारसायकलचा आणखी एक अपघात झाला होता. बसमध्ये ४४ प्रवासी होते. धडकेनंतर मोटारसायकल बसखाली काही अंतरापर्यंत ओढली गेली, यामुळे बाईकची पेट्रोल टाकी फुटली. यामुळे मोठी आग लागली.
दोन्ही दुचाकीस्वार मद्यधुंद...
बंगळुरूला जाणाऱ्या बसला आग लागण्याचे कारण ठरलेल्या मोटारसायकलवरील दोघेही मद्यधुंद होते असं हैदराबाद पोलिसांनी सांगितले. कुर्नूल रेंजचे पोलिस उपमहानिरीक्षक कोया प्रवीण म्हणाले की, फॉरेन्सिक चाचण्यांमधून मोटारसायकलवरील दोघेही (शिव शंकर आणि एरी स्वामी) मद्यधुंद असल्याचे पुष्टी झाली आहे.
पोलिसांनी सांगितले की, दोघांनी एका रेस्टॉरंटमध्ये जेवण केले आणि स्वामींनी दारू पिल्याची कबुली दिली. शिव शंकर पहाटे २ वाजता लक्ष्मीपुरम गावातून स्वामींना तुग्गली गावात सोडण्यासाठी निघाले. कुर्नूलचे पोलिस अधीक्षक विक्रांत पाटील यांनी सांगितले की, वाटेत दोघेही पहाटे २.२४ वाजता एका कार शोरूमजवळील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी थांबले.
बाईकवरील दोघे एका पेट्रोल पंपावर थांबल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये शंकर बेपर्वाईने दुचाकी चालवत असल्याचे दिसून आले. पेट्रोल पंप सोडल्यानंतर काही वेळातच दुचाकी घसरली, यामुळे शंकर उजवीकडे वळला आणि दुभाजकावर आदळला आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून दक्षिणेकडील राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे रस्ते निसरडे झाले आहेत.