डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 22:14 IST2025-11-18T22:13:00+5:302025-11-18T22:14:18+5:30
तपासातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दोघेही कट्टरपंथी विचारांनी प्रेरित असले तरी कट कसा पुढे न्यायचा, यावर कधीच एकमत झाले नाही...

डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या कार ब्लास्ट तपासात सातत्याने नव-नवे खुलासे होताना दिसत आहेत. आता माध्यमांनी शीर्ष गुप्तचर सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर डॉ. उमर आणि मॉड्यूलचा तथाकथित प्रमुख मानला जात असलेला डॉ. मुजम्मिल यांच्यात गंभीर मतभेद निर्माण झाले होते. यामुळे या टेरर मॉड्यूलमधील सदस्यांतही मतभेदांची स्थिती निर्माण झाली. सूत्रांच्या मते, प्लॅन 9/11 सारख्या हल्ल्याचा होता.
खरे तर, सप्टेंबर महिन्यातच मोठा हल्ला करण्याची उमरची इच्छा होती. मात्र त्याच्या आक्रमक स्वभावामुळे मॉड्यूलमध्येच मतभेद निर्माण झाले आणि त्या महिन्यात ही योजना यशस्वी हऊ शकली नाही. दरम्यान, ‘न्यूज १८’ ने सूत्रांच्या हवाल्यने दिलेल्या माहितीनुसार, उमर आणि मुजम्मिल यांच्यात वैचारिक आणि ऑपरेशनल पातळीवर प्रचंड मतभेद होते. अगदी टार्गेट निवडण्यापासून ते हल्ल्याची वेळ ठरवण्यापर्यंत दोघांमध्ये मतभेद होते. उमरच्या आक्रमकतेमुळे मॉड्यूलची संघटनात्मक क्षमता कमकुवत झाली.
तपासातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दोघेही कट्टरपंथी विचारांनी प्रेरित असले तरी कट कसा पुढे न्यायचा, यावर कधीच एकमत झाले नाही.
इंटरसेप्ट केलेल्या चॅट्समधून आणि चौकशीतून समोर आले आहे की, सप्टेंबर महिन्यातच हल्ल्याचा प्लॅन करण्याचा उमरचा आग्रह होता. “9/11 च्या पार्श्वभूमीवर याचे वैचारिक महत्त्व” असल्याचे त्याचे म्हणणे होते. मात्र, त्याच्या मानसिक अस्थिरतेमुळे आणि उतावीळपणामुळे मॉड्यूलमध्येच मतभेद निर्माण झाले.
सततच्या अंतर्गत मतभेदांमुळे मुजम्मिलने, कथितरित्या या योजनेचा काही भाग एका महिला डॉक्टरला सांगितला. त्याने, भीतीमुळे आणि स्वतःला या दहशतवादी घटनाक्रमापासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने, असे केले असण्याची शक्यता आहे. मात्र एकंदरितच, डॉ. उमरचा सप्टेंबरमधील हल्ल्याचा अथवा घातपाताचा प्लॅन यशस्वी होऊ शकला नाही. कारण या नेटवर्कमध्ये प्रचंड मतभेद होते.