डॉ. मनमोहन सिंग यांचे स्मारक उभारणीची प्रक्रिया सुरू, 'ही' जागा जवळपास निश्चित...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 17:51 IST2025-01-01T17:51:20+5:302025-01-01T17:51:43+5:30
Manmohan Singh Memorial: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी केंद्र सरकारने काही जागा सुचवल्या आहेत.

डॉ. मनमोहन सिंग यांचे स्मारक उभारणीची प्रक्रिया सुरू, 'ही' जागा जवळपास निश्चित...
Manmohan Singh Memorial: देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे बुधवार, 26 डिसेंबर 2024 रोजी निधन झाले, तर शनिवारी दिल्लीतील निगमबोध घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता त्यांचे स्मारक उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्र सरकारने स्मारकासाठी मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांना काही जागांचे पर्याय देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारने कुटुंबाला दिलेल्या पर्यायांमधून एक जागा निवडण्यास सांगितले आहे. एकदा जागेची निवड झाली की, लगेच स्मारकाचे काम सुरू होईल. मात्र, यासाठी आधी ट्रस्ट तयार करणे आवश्यक आहे. नव्या धोरणानुसार जमिनीचे वाटप ट्रस्टलाच करता येणार आहे. ट्रस्टची स्थापना झाल्यानंतरच स्मारकाच्या उभारणीचे काम सुरू करता येईल.
एक ते दीड एकर जमीन
ट्रस्टची स्थापना झाल्यानंतर ती जमिनीसाठी अर्ज करेल. जमीन वाटप केल्यानंतर CPWD सोबत सामंजस्य करार केला जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी राजघाट, राष्ट्रीय स्मारक किंवा किसान घाटाजवळ एक ते दीड एकर जमीन दिली जाऊ शकते.
अधिकाऱ्यांनी स्मारकाला भेट दिली
स्मारकासाठी नगरविकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी राजघाट आणि आसपासच्या भागाला भेट दिली आहे. नेहरू-गांधी घराण्यातील नेत्यांच्या समाधीजवळ मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा दिली जाण्याची शक्यता आहे. याच ठिकामी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि संजय गांधी यांच्या समाधी आहेत.
काँग्रेसचा आरोप भाजपचे प्रत्युत्तर
मनमोहन सिंग यांच्या स्मारकाबाबत काँग्रेस सरकारवर सातत्याने टीका करत आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी आणि स्मारकासाठी जागा न देणे हा भारताच्या पहिल्या शीख पंतप्रधानांचा जाणीवपूर्वक अपमान आहे, असा आरोप अलीकडेच काँग्रेसने केला होता. त्यावर भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले होते की, कोणताही अपमान झालेला नाही. येत्या काही दिवसांत स्मारक नक्कीच उभारले जाईल. आम्ही नेहमीच मनमोहन सिंग यांच्या कार्याचे कौतुक केले आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे.